किव्ह – युक्रेनच्या नागरिकांना ठार मारून युद्ध गुन्हे केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या रशियाच्या सैनिकाला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. रशियाने आक्रमण केल्यापासून पहिल्यांदाच एका सैनिकाला युद्धगुन्ह्यांच्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. सार्जंट शिशिमारीन असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या या 21 वर्षीय रशियन सैनिकाचे नाव आहे. युक्रेनच्या ईशान्येकडील सुमी गावात गावकऱ्याला डोक्यात गोळी मारून ठार केल्याबद्दल त्याच्यावर खटला चालवण्यात आला होता.
मात्र आपण केवळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन केले असे या सैनिकाने आपल्या निवेदनात सांगितले. गावामध्ये दिसलेला युक्रेनचा नागरिक हा मोबाइलवर बोलत होता. मात्र तो गावात आलेल्या रशियाच्या सैन्याची माहिती युक्रेनच्या फौजांना सांगू शकेल. म्हणून त्याला मारण्याची आज्ञा वरिष्ठांनी आपल्याला दिली होती, असे त्याने सांगितले.