नागपूर : आपल्या प्रियकरासोबत बाहेर घालवलेला वेळ लपवण्यसाठी एका 21 वर्षीय तरूणीने आपल्या अपहरणाची कथा रचून कुटुंबियांना सांगितली. कुटूंबियांनी या अपहरणाच्या कथेवर विश्वास रचून पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. असे गिट्टीखादन पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गांगुर्डे यांनी सांगितले.
महाविद्यालयात जात असताना एका मोटारीतून आलेल्या चार जणांनी आपल्याला उचलून नेले. एका निर्जन टिकाणी तिला नेले. तिने धाडस दाखवून स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली, असे या फिर्यादीत नमूद केले होते. फिर्याद दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी गुन्हे शाखेचे पोलिसही या तपासात दाखल झाले. तिच्या जबाबात तफावत येत असल्याने पोलिसांचा संशय वाढला.
पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी ही युवती दुसऱ्या मुलाच्या मागे बसून दुचाकीवर जात असल्याचे दिसले. पोलिसांनी हे चित्रिकरण कुटुंबियांनी दाखवू असे सांगताच ती युवती बोलू लागली. महाविद्यालयातील तास संपल्यावर नागपूरबाहेरील वाकी येथे फिरायला गेली. त्यानंतर त्याने तिला तिच्या घराजवळ सोडले. न सांगता बाहेर गेल्याने कुटुंबीय ओरडतील म्हणून तिने अपहरणाचा बनाव रचला.
तिच्या या कथेवर पालकांनी विश्वास ठेवला हे प्रकरण पालकांनी गांभीर्याने घेत पोलिसांत धाव घेतली. पोलिस तपासात अपहरणाचे हे पितळ अखेर उघडे पडले.