21 हजार 144 किलो प्लॅस्टिक कचरा गोळा

स्वच्छता महाश्रमदान उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे – “स्वच्छता ही सेवा-2019′ मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 871 गावांमध्ये स्वच्छता महाश्रमदान उपक्रम राबविण्यात आला. त्याअंतर्गत 21 हजार 144 किलोग्रॅम प्लॅस्टिक कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दि. 11 सप्टेंबर ते दि. 27 ऑक्‍टोबरदरम्यान “स्वच्छता ही सेवा-2019 अभियान” राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.

बुधवारी (दि. 2) स्वच्छता महाश्रमदान जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर खाते प्रमुखांची नियंत्रण व संपर्क अधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हास्तरावरील सर्व खाते प्रमुख तसेच तालुकास्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन अभियान राबविले.

जिल्ह्यात एकवेळ वापरातील प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी घालण्यात आलेली आहे. यापुढे सर्व गावांनी असे प्लॅस्टिक वापरू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच यापुढे कोणत्याही गावात एकवेळ वापरातील प्लॅस्टिक आढळल्यास संबंधित विक्रेते व वापरकर्ते यांचेवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिले आहे. यावेळी जिल्ह्यात स्वच्छता रॅली, स्वच्छता श्रमदान, प्लॅस्टिक गोळा करणे, वृक्ष लागवड, पाण्याची ठिकाणांची स्वच्छता, प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, कापडी/कागदी पिशव्यांचे वाटप, स्वच्छतेची शपथ उपक्रम राबवण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)