शेवगाव – कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव शेवगाव विधानसभा मतदारसंघातील 21 जणांना 19 ते 21 ऑक्टोबरदरम्यान शेवगाव तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या शिफारशीवरून प्रातांधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांनी 21 जणांच्या हद्दपारीचा आदेश काढला आहे.
संबंधित 21 जणांना मतदानाचा कायदेशीर हक्क बजावण्यासाठी 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत तालुका हद्दीत येण्याकरिता सशर्त परवानगी देण्यात आली आहे. निवडणूक काळात शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी वास्तव्य करू नये. सदर काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून या संदर्भातचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी दाखल केला होता.
यामध्ये आकाश भोसले, हरकू भोसले, नागनाथ काळे (सर्व रा. पाथर्डी रोड, शेवगाव), अभिमन्यू कुसळकर (वडारगल्ली, शेवगाव), संजय कोळगे व कचरू चोथे (रा. आव्हाणे बु, ता. शेवगाव), नवनाथ इसारवाडे (रा. गदेवाडी, ता. शेवगाव), महेंद्रा विखे व अर्जुन शिंदे (रा. देवटाकळी, ता. शेवगाव), बबलू ऊर्फ अविनाश मिसाळ, त्रिंबक रक्टे, विजय हुगे, कल्याण गव्हाणे, मंगेश राजेभोसले, श्रीधर रकटे, अशोक रक्टे, बाळासाहेब हिंगे (सर्व रा. मुंगी, ता. शेवगाव), राजेंद्र दौंड, बाजीराव दौंड, वैजीनाथ दौंड, शिवनाथ खेडकर ( रा. कोनोशी, ता. शेवगाव) यांचा समावेश आहे.
विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश
या 21 जणांमधील आव्हाणे बुद्रुक येथील संजय कोळगे हे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत, तर कचरू चोथे भाजपच्या किसान सभेचे तालुकाध्यक्ष आहेत. दोघेही सध्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर या दोघांमध्ये भांडणे झाली होती.