पिंपरीत करोनामुळे 21 रुग्णांचा मृत्यू

  • एका दिवसात 15,578 नागरिकांच्या करोना चाचण्या
  • घसरु लागला बाधितांचा आकडा
  • 2396 जणांना लागण

पिंपरी – करोनामुळे 21 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 15 रुग्ण शहरातील असून 6 जण शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणारे आहेत. यामुळे एकूण मृत्यूंचा आकडा 2981 इतका झाला आहे. त्यातील 2122 मृत्यू शहरातील असून शहरात उपचारासाठी बाहेरुन आलेल्या 859 रुग्णांचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये शहरात रेकॉर्डब्रेक अशा 15,578 नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. तसेच गेल्या 24 तासांमध्ये शहरातील 2351 आणि शहराबाहेरील 45 अशा 2396 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुरुवारी दुपारी चार पर्यंतच्या अहवालानुसार गेल्या 24 तासांमध्ये शहरात 15,578 जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. गेल्या दोन दिवसांमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 12,942 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 3025 जणांचे अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये 1453 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या बाधितांची संख्या 1 लाख 33 हजार 839 इतकी झाली आहे.

शहरात सध्या करोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 25 हजारांच्या पुढे गेली आहे. महापालिका व अन्य रुग्णालयांमध्ये 4492 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 20, 666 रुग्ण हे गृहविलगीकरणात करोनावर उपचार घेत आहेत. अशाप्रकारे सद्यस्थितीत 25,158 करोनाबाधित उपचाराधीन आहेत.

ड प्रभागात सर्वाधिक रुग्ण
शहराच्या ड प्रभागा अंतर्गत येणाऱ्या परिसरात करोनाचा उद्रेक पहायला मिळाला आहे. ड प्रभागात तब्बल 522 करोना रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल ब प्रभागात 367 रुग्ण असून सर्वांत कमी रुग्ण ड प्रभागाच्या जवळच असणाऱ्या ह प्रभागात आहेत. ह प्रभागात 204 रुग्ण आढळले आहेत.

मावळात आणखी 97 करोनाबाधित
मावळ तालुक्‍यात गुरुवारी (दि. 8) 97 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्‍यात दिवसभरात 102 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 238 रुग्णांचा करोनाने मृत्यू झालेला आहे.
रुग्णांची संख्या 710 आहे. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 40
रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 18 रुग्ण तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. तालुक्‍यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 10,513 झाली आहे. तर दिवसभरात 102
जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी आढळलेल्या करोना रुग्णांमध्ये
शहरी भागात 58 रुग्ण तर ग्रामीण भागात 39 रुग्ण सापडले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.