नगर शहरात 204 शाळा तंबाखू-सिगारेटच्या विळख्यात

शैक्षणिक संस्थांकडून कोटपा कायद्याला केराची टोपली : स्नेहालयच्या सर्वेक्षणातून सिद्ध

…तर 7 वर्षे सश्रम कारावास

सिगारेट्‌स आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा 2003 नुसार कलम- 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. तर कलम- 6 (ब) नुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे गुन्हा आहे. या कलमानुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेने आपला शाळा- महाविद्यालय परिसरात धूम्रपान प्रतिबंधात्मक निषेध क्षेत्राचा फलक आणि प्रवेशद्वारावर तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था आणि उल्लंघन केल्यास दंड आकारणार धूम्रपान प्रतिबंधात्मक निषेध क्षेत्राचा सूचना फलक लावणे किंवा भिंत रंगवणे नमूद केले आहे. तसे आढळल्यास बाल न्याय कायदा 2015 कलम- 77 नुसार सात वर्ष सश्रम कारावास आणि एक लाखापर्यंतचा दंड अशी शिक्षा आहे.

कार्यवाही करून अहवाल सादर करा

कोटपा कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांना सूचित करण्यात आलेल्या धूम्रपान प्रतिबंधात्मक निषेध क्षेत्र फलकांची पूर्तता करून कार्यवाही करावी तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयात सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने सर्व गटशिक्षणाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, महापालिका प्रशासन अधिकारी आणि नगर परिषदांना दिले आहेत.

नगर  –  शाळा -महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे म्हणून तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, नगर शहरातील 204 शैक्षणिक संस्थांनी तंबाखू विरोधी कोटपा कायद्याला केराची टोपली दाखविली असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. परिणामी नगरमधील या शाळा तंबाखू-सिगारेट विक्रीच्या विळख्यात असल्याचे चित्र आहे.

नगरमधील स्नेहालय संस्था व संबंध हेल्थ फाऊंडेशनतर्फे आपले शहर व्यसनमुक्त नगर हे व्यसन विरोधी अभियान हाती घेण्यात आले आहे. 31 मे जागतिक तंबाखू विरोधीदिनी नगरमधील विद्यार्थी आणि रहिवाशांनी तंबाखू विरोधी संदेश रॅली काढून या अभियानाची सुरुवात केली. वयानिमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्नेहालय आणि संबंध हेल्थ फाउंडेशनतर्फे नगर शहरातील माळीवाडा, सावेडी, तारकपूर, केडगाव, बोल्हेगाव, मुकुंदनगर, बुऱ्हाणनगर, दरेवाडी, वाकोडी, कॅम्प परिसर, श्रीरामनगर या सर्वच विभागातील सरकारी, पालिका आणि खासगी अशा 204 शाळांना प्रत्यक्षभेटी देऊन कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सर्वेक्षण करण्यात आले.

त्यात सर्वच शैक्षणिक संस्थांनी सिगारेट्‌स आणि तंबाखूजन्य उत्पादने कायदा 2003 नुसार कलम – 6 (ब) अंतर्गत शाळा परिसर आणि शाळेच्या गेटवर बाहेरच्या दिशेने आवश्‍यक ते सूचना फलक लावण्याची कार्यवाही केलेली नाही. शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाने 7 जुलै 2015 रोजी परिपत्रक काढून शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरास निर्बंध घातले आहेत. शिवाय केंद्र सरकारने कोटपा कायद्याची अंमलबजावणी राज्यभरात सुरू असताना नगरमधील या 204 शाळांनी त्याकडे कानडोळा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.