नवी दिल्ली – सरलेल्या वर्षात घाऊक वाहन विक्री म्हणजे कंपन्यांनी विसरकांना विकलेल्या वाहन विक्रीत 12% वाढ झाली आहे. दुचाकीची मागणी शहराबरोबरच ग्रामीण भागातून वाढल्यामुळे विक्री वाढण्यास मदत झाली आहे असे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चरर्स या संघटनेचे अध्यक्ष शैलेश चंद्र यांनी सांगितले.
2023 मध्ये एकूण घाऊक वाहन विक्री 2.54 कोटी इतकी झाली. 2023 मध्ये ती 2.28 कोटी इतकी होती. या वर्षाच्या सुरुवातीच्या 6 महिन्यात विकास दर वाढण्यासाठी पोषक वातावरण होते. त्याचबरोबर ग्रामीण भागातून क्रयशक्ती वाढल्यामुळे वाहनांना चांगली मागणी होती. त्यामुळे सरलेले पूर्ण वर्ष या उद्योगासाठी नफा दायक ठरले आहे. सरलेल्या वर्षांमध्ये दुचाकी विक्री तब्बल 14.5 टक्क्यांनी वाढून 1.95 कोटी इतकी झाली आहे. जी की गेल्या वर्षी 1.70 कोटी इतकी होती. यामध्ये स्कूटर बाईक आणि मोपेडचा समावेश आहे.
स्कूटरची विक्री 20 टक्क्यांनी वाढून 66 लाखापर्यंत गेली आहे. तर बाईकची विक्री 12 टक्क्यांनी वाढून 1.23 कोटीवर गेली आहे. 2024 मध्ये प्रवासी वाहन विक्री चार टक्क्यांनी वाढून 43 लाख युनिट झाली. तर तीन चाकी वाहनाची विक्री सात टक्क्यांनी वाढून 7.3 लाख युनिट झाली. मात्र व्यावसायिक वाहनांची विक्री तीन टक्क्यांनी कमी होऊन 9.5 लाख युनिट झाली. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार पायाभूत सुविधा क्षेत्रावर अधिक लक्ष देणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आगामी काळामध्ये व्यावसायिक वाहनांची विक्री वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
डिसेंबर महिन्यात प्रवासी वाहन विक्री 10 टक्क्यांनी वाढून 3.14 लाख युनिट झाली. या महिन्यात दुचाकीची विक्री 9 टक्क्यांनी कमी होऊन 11.05 लाख युनिट झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतही वाहन विक्री विक्रमी झाली आहे. कारण या काळात भारतात दसरा, दिवाळी आणि इतर बरेच सण येतात.