नव्या तंत्रज्ञानाच्या आधाराचा व्यावसायिकांना होतोय लाभ
नवी दिल्ली – रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या चांगलीच मंदी असली तरी 2019 मध्ये घरांची आणि व्यावसायिक जागांची चांगली खरेदी झाली आहे. 2020 मध्ये हे प्रमाण वाढेल असा अंदाज या क्षेत्रातील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला जात आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातल्या गुंतवणुकीद्वारे विविध लाभ मिळवण्याचे अनेक पर्याय समोर येत असल्याने या क्षेत्राला 2020 मध्ये पुन्हा एकदा चैतन्य प्राप्त होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रिअल इस्टेट क्षेत्राचं पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकारने काही पावलं उचलली आणि बिल्डर्सनी ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजना सादर केल्या. रेरामुळे ग्राहकांना घरखरेदीतल्या फसवणुकीला आळा घालू शकणारा कायदेशीर पर्याय उपलब्ध झाला आणि परवडणाऱ्या किंमतीतल्या घरांमुळे कमी पैशात स्वतःचं घर मिळवणं शक्य झालं आहे. त्यामुळे ग्राहक आणि बिल्डर यांच्यात एक प्रकारचं सामंजस्य निर्माण झाल्याचं वातावरण पहायला मिळत आहे. त्यामुळेच 2020 मध्ये घरखरेदीला मोठी चालना मिळेल, असा अनेक घरबांधणी व्यावसायिकांचा अंदाज आहे.
केंद्र सरकारनं स्टार्ट अपना उत्तेजन देण्याचं धोरण आखलं आहे. शिवाय उद्योगक्षेत्रातली मंदी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. तुलनेत रोजगार कमी असल्यानं अनेक सुशिक्षित तरुण स्वयंरोजगाराकडे वळू लागले आहेत. त्यामुळे व्यापारी संकुलांतल्या जागांना मोठी मागणी असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यातही जागा भाड्यानं घेण्याकडे अधिक कल असेल. याचा अर्थ व्यापारी जागा कमी प्रमाणात विकल्या गेल्या तरी मोठ्या प्रमाणात भाड्यानं घेतल्या गेल्यामुळे या व्यावसायिकांना नफाच मिळणार आहे.
नव्या तंत्रज्ञानाचा लाभ
बांधकाम क्षेत्रात गेल्या दोन वर्षांमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर वाढीला लागला आहे. चॅटबोट, बीआयएम, ड्रोन वापरून ग्राहकांना झटपट माहिती दिली जात आहे. त्यामुळे इतर गुंतवणुकीच्या तुलनेत ही गुंतवणूक सोपी आणि सुरक्षित बनली आहे. वाढत्या शहरीकरणामुळेही घरांची मागणी वाढली असून क्रेडाई आणि जेएलएल यांच्या अहवालात 2020 पर्यंत रिअल इस्टेटच्या क्षेत्रातली उलाढाल 180 अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परवडणाऱ्या किंमतीतल्या आणि मध्यम आकाराच्या घरांना वाढती मागणी आहे. मध्यमवर्गीय गुंतवणूकदार मध्यम आकाराच्या घरांमध्ये अधिकाधिक सुविधा असाव्यात, याकडे लक्ष देत आहे. त्यासाठी अनेकदा थोडे जास्त पैसे मोजण्याचीही तयारी असलेल्या ग्राहकांची संख्या सध्या वाढत चालली आहे.
सध्या सरकारी पातळीवर परदेशी गुंतवणुकींचं प्रमाण वाढवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेही ए ग्रेड कार्यालयीन जागांना मोठी मागणी आहे. 2020 मध्ये ती आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त होत आहे. एखादी कंपनी अशी जागा विकत घेऊन आपल्या जागेतली थोडी जागा दुसऱ्या कंपनीला भाड्यानं देत असल्यामुळेही व्यापारी संकुलांमधल्या जागांना सध्याच मागणी वाढली आहे. अधिक रक्कम गुंतवणं शक्य असलेल्या गुंतवणूकदारांनी खात्रीच्या व्यावसायिक प्रकल्पांमध्ये बांधकामाच्या सुरुवातीपासूनच रक्कम गुंतवली तर कमी किंमतीत उत्तम जागा मिळू शकेल. ही जागा विकून किंवा भाड्यानं देऊन ते नफा मिळवू शकतील. ठिकठिकाणी उभ्या राहणाऱ्या आयटी पार्कमध्ये पुढील वर्षी भर पडेल, अशी शक्यता व्यक्त होत असून त्यामुळे मोक्याच्या ठिकाणाबरोबरच खास आयटी पार्क बांधलेल्या ठिकाणी जागा खरेदी करण्याकडे कंपन्यांचा कल वाढीस लागला आहे. आयटी कंपन्या अधिकाधिक सुविधांनी सुसज्ज कार्यालयांवर भर देत असल्यानेही ए आणि बी दर्जाच्या जागांची मागणी वाढत चालली आहे.