पिंपरी – नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या 202 तळीरामांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई भोसरी पोलिसांनी केली. तर सर्वात कमी कारवाई चाकण पोलिसांच्या हद्दीत झाली.
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांमुळे कोणताही अपघात होऊ नये म्हणून 31 डिसेंबर रोजी पोलीस शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करतात. दारू पिऊन वाहने चालवणाऱ्या संशयित चालकांची पोलिसांनी ब्रीद ऍनालायजरच्या साहाय्याने तपासणी करतात. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते. दारू पिऊन वाहन स्वतः आणि इतरांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.
मद्य प्राशन करून वाहन चालविल्यास पोलिसांकडून न्यायालयात खटला दाखल करण्यात येतो. गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला सुमारे अडीच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. तसेच वाहन चालकाचा परवाना किमान तीन महिन्यांसाठी रद्द होऊ शकतो.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या कारवाईमध्ये 202 तळीरामांवर यावर्षी खटले दाखल करण्यात आले आहेत. मागील वर्षी हा आकडा 127 होता.