अलेक्‍सी नवालनी यांच्या 2 हजार समर्थकांना अटक

मॉस्को, – रशियातील विरोधी नेते ऍलेक्‍सी नवालनी यांच्या अटकेच्या निषेधार्थ शनिवारी मॉस्कोमध्ये हजारो जणांचा मोर्चा काढण्यात आला होता. रशियातील मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गसह अनेक शहरांमध्ये एकाचवेळी असे मोर्चे काढण्यात आले होते.

जवळपास 70 ठिकाणी असे मोर्चे काढले गेले असल्याचे रशियातील आंदोलनाशी संबंधित निरीक्षक गटाने म्हटले आहे. हे मोर्चे दडपण्यासाठी रशियन पोलिसांनी बळाचा वापर केला आणि 2 हजारपेक्षा अधिक लोकांना अटक केली. सेंट पीटर्सबर्गमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्षही झाला. ठिकठिकाणी पोलिसांकडोन आंदोलकांच्या नेत्यांची धरपकड सुरू असल्याने अटकेतील व्यक्‍तींची संख्या अधिक वाढण्याची शक्‍य्ता आहे.

मॉस्कोतील पुश्‍कीनस्काया चौकामध्ये सुमारे 4 हजार जणांचा मोर्चा काढला गेला. या मोर्च्याला परवानगी मिळाली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. या मोर्च्यातील लोकांनी पोलिसांवर पाण्याच्या बाटल्या आणि अंडी फेकण्यास प्रारंभ केला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास प्रारंभ केला. आंदोलकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आंदोलकांनी पांढऱ्या रंगाचा स्प्रे मारला. याच पोलिसांवर अन्य आंदोलकांनी बीअरचे कॅन फेकून मारायला सुरुवात केली. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांदरम्यानचा संघर्ष अधिकच पेटला.

अध्यक्ष पुतीन यांचे कट्टर विरोधक असलेल्या नवालनी यांना याच आठवड्यात अटक करण्यात आली आहे. विषबाधेवरील उपचारासाठी ते जर्मनीला गेले होते. तेथून परतल्यावर विमानतळावरच त्यांना अटक करण्यात आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.