पिंपरी- चिंचवड शहरातील पेठ क्रमांक 7, 10 आणि कुदळवाडी परिसरात जवळपास नऊ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. रावेत, थेरगाव, सांगवी, पिंपळे गुरव, चिंचवड, भोसरी एमआयडीसी, निगडी अशा शहराच्या विविध भागांमध्ये सकाळी सहापासून वीज पुरवठा खंडित झाला. टप्प्याटप्प्याने हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. चिंचवड परिसरात साडेतीन ते चार तासाने वीज पुरवठा सुरळीत झाला. पिंपरीतही जवळपास साडेचार तासाने वीज पुरवठा पुर्ववत सुरू झाला. थेरगाव, सांगवी, पिंपळे गुरव आदी परिसरामध्ये सकाळी सहा वाजता खंडित झालेला वीज पुरवठा दुपारी बाराच्या सुमारास काही काळासाठी सुरू झाला. त्यानंतर पुन्हा काही तासांसाठी वीज पुरवठा खंडित झाला होता.
लघुउद्योगांचे कोट्यवधींचे नुकसान
शहरातील सुमारे दोन हजार लघुउद्योगांना खंडित वीज पुरवठ्यामुळे मोठा फटका बसला. ज्यांच्याकडे जनरेटरची व्यवस्था आहे त्यांनी पर्यायी व्यवस्था केली. मात्र, ज्यांच्याकडे या सुविधेचा अभाव आहे, त्यांची प्रचंड गैरसोय झाली. मोठ्या उद्योगांना आवश्यक कच्च्या मालाच्या उत्पादन प्रक्रियेत जवळपास सहा ते नऊ तासांचा खंड पडला. चाकण एमआयडीसीतील लघुउद्योगांनाही याचा मोठा फटका बसला.
जनजीवनावरही परिणाम
वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम जनजीवनावरही झाला होता. शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. घरातील टीव्ही, फ्रीज, फॅन, मोबाइल व लॅपटॉपचे चार्जिंग अशा सर्वच यंत्रणा बंद पडल्या होत्या.
कुठे किती वाजता आली वीज?
रावेत ः दुपारी 3, चिंचवड ः सकाळी 9.30, भोसरी सकाळी 10.05, वाकड ः दुपारी 1.00, सांगवी ः दुपारी 12.30, माण, नेरे, जांबे ः दुपारी 3, हिंजवडी ः सकाळी 10.45, कासारवाडी सकाळी 10.00, मोरवाडी, अजमेरा कॉलनी ः सकाळी 11.15. दरम्यान, सध्या बारावीच्या द्वितीय सराव परीक्षा सुरू आहेत. वीज नसल्याने मुलांची गैरसोय झाली. मुलांना आगाऊ वेळ देऊन परीक्षा घेतली, असे शिक्षकांनी सांगितले.
बॅंका, शाळा, रुग्णालयांच्या कामकाजावर परिणाम
शहरातील विविध बॅंकांमध्ये आज संगणकावरील आवश्यक कामकाजासाठी जनरेटरचा वापर करण्यात आला. मात्र, बॅंकांतील अन्य वीज पुरवठा बंद होता. सध्या शहरामध्ये “ऑफलाइन’ व ऑनलाइन शाळा सुरू आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्याने शाळांनाही जनरेटरचा आधार घ्यावा लागला. रुग्णालयांमध्ये वीज पुरवठ्यावरच सर्व यंत्रणा चालते. शस्त्रक्रिया व अन्य यंत्रसामग्री चालू ठेवण्यासाठी रुग्णालयांनाही बराच वेळ जनरेटर चालवावे लागले.
आज सकाळी सहापासून वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रुग्णालयाच्या कामकाजावर परिणाम झाला. हा पुरवठा पुर्ववत सुरळीत होईपर्यंत रुग्णालयासाठी जनरेटरचा वापर करावा लागला.
– डॉ. श्रीकृष्ण जोशी, लोकमान्य रुग्णालय, निगडी.
शहरातील जवळपास दोन हजार लघुउद्योगांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला. त्यांचे सुमारे 250 ते 300 कोटी रुपयांचे नुकसान झाले. पेठ क्रमांक 7, 10 आणि कुदळवाडी परिसरात जवळपास नऊ तास वीज पुरवठा खंडित झाला होता.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष,
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना.