पणजी: देशव्यापी लॉकडाऊनमुळे गोव्यात सुमारे 2 हजार परदेशी पर्यटक अडकून पडले आहेत. परदेशी पर्यटकांना त्यांच्या देशांमध्ये सुखरूप पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गोव्यात अडकून पडलेल्या परदेशी पर्यटकांमध्ये ब्रिटीशांची संख्या मोठी आहे. त्यातील अनेक जण सहा महिन्यांपासून गोव्यातच मुक्काम ठोकून आहेत. आता लॉकडाऊनमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तू मिळवताना त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अर्थात, गोव्याच्या ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनमुळे त्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळत आहे.
असोसिएशनकडून परदेशी पर्यटकांना सर्वतोपरी मदत पुरवण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. परदेशी पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी विमाने येत आहेत. मात्र, टॅक्सी बंद असल्याने त्या पर्यटकांना गोवा विमानतळावर पोहचणे अवघड जात आहे. मंगळवारी दोन परदेशी विमाने गोव्यात दाखल झाली. त्या विमानांमधून रशिया, जर्मनी आणि इतर युरोपीय देशांमधील सुमारे 450 पर्यटक त्यांच्या देशांकडे रवाना झाले. आता ब्रिटीश पर्यटकांना पाठवण्यासाठी ब्रिटनच्या दूतावासाशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यामुळे ब्रिटीश पर्यटकांनाही लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.