एलूरु (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशातील एलूरु तालुक्यात गूढ आजारामुळे सुमारे 200 जण अत्यवस्थ असल्याची माहिती तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपस्माराशी साधर्म्य असलेल्या या आजारामुळे अनेक जणांना फेफरे येण्याच्या घटना उघड होत आहेत.
आतापर्यंत 228 जणांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या आजाराविषयी डॉक्टरांमध्ये एक प्रकारची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
आजारी पडलेले रुग्ण एकमेकांचे नातेवाईक नाहीत. एलूरु तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे हे रहिवासी आहेत. हे सर्वजण कोणत्याही एकाच कार्यक्रमामध्ये सहभागी देखील झालेले नव्हते. आतापर्यंत 70 रुग्णांना प्राथमिक उपचारांनंतर घरी सोडून देण्यात आले आहे. सध्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये 76 महिला आणि 46 बालकांचा समावेश आहे.
आजारी पडलेल्या बहुतेक रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि बालकांचा समावेश आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी एलूरु येथे भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली आहे. तसेच या रोगाची माहितीही घेतली. सर्व रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून प्रयोगशाळेमधील तपासण्यांचे अहवाल सर्वसामान्य आढळले आहेत.