Pune | आणखी २०० कोटी बॅंकेत

पुणे,- लोकसभा निवडणुकीनंतर महापालिका प्रशासनाने सुमारे ५०० कोटी रुपयांच्या ठेवी बॅंकेत ठेवल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीनंतर आणखी २०० कोटी रुपयांच्या ठेवी बॅंकेत ठेवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे.
निवडणूकांची आचारसंहिता तसेच निविदा प्रक्रिया वेळेत राबविण्यात आल्या नाहीत. तसेच महापालिकेच्या खर्चापेक्षा उत्पन्न अधिक ठरले. त्यामुळे प्रशासनाकडून या ठेवी बॅंकेत ठेवण्यात येत आहेत. अंदाजपत्रकात दरवर्षी जमा आणि खर्चाचे आकडे निश्चित असतात. वर्षभर मिळणाऱ्या उत्पन्नातून हा खर्च भागवला जातो.
मात्र, या वर्षी सलग दोन निवडणुकांमुळे महापालिकेस विशेष भांडवली कामे करता आलेली नाहीत. परिणामी, महापालिकेस नोव्हेंबर अखेरपर्यंत खर्चापेक्षा उत्पन्न जास्त मिळाल्याने प्रशासनाकडून हे पैसे बॅंकेत ठेवण्यात येणार आहेत. तसेच निवडणुकांच्या तोंडावरही शासनाकडून महापालिकेस विविध अनुदाने प्राप्त झाली आहेत.





