पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी धरणात 20 टक्के पाणीसाठा ठेवावा : सतेज पाटील

कोल्हापूर- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज राधानगरी धरणाला भेट देऊन धरणातील उपलब्ध पाणी साठ्याची माहिती घेतली. संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी धरणात 20 टक्के पाणीसाठा ठेवावा तसेच धरणातील पाणी हे नियोजनपूर्वक सोडावे अशा सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

सध्या धरणात 27 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या भागात अतिवृष्टी झाल्यावर हे धरण लवकर भरते. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीचा धोका टाळण्यासाठी आणि पूर परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी पाटबंधारे विभागाने धरणात जूनअखेर 20 टक्केच पाणीसाठा ठेवावा.

पाण्याचा विसर्ग हा योग्य नियोजन करूनच करावा. त्याचबरोबर पावसाळ्यात सर्व अधीकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राधानगरी धरणावरील सीसीटीव्ही तसेच पोलिस बंदोबस्त ठेवण्याबाबतच्या सूचनाही पाटील यांनी दिल्या.

काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. नामदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी काळम्मावाडी जलाशयाजवळ सुरू असलेल्या जॅकवेल आणि इंटेक व्हेलच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.

कोविडच्या संसर्गामुळे या कामाला सुमारे सव्वा वर्ष फटका बसला. आता प्राधान्याने कामे करण्याच्या सूचना केल्या असून ही योजना जानेवारी 2022 मध्ये पूर्ण होईल अशी माहिती पाटील यांनी दिली. या पहाणीनंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह या योजनेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्‍यक सूचना केल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.