ऊस उत्पादन वाढीसाठी भीमाशंकरकडून १४ वर्षांपासून उपक्रम
मंचर – पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातर्फे मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने ऊस उत्पादन वाढीसाठी 14 वर्षांत 20 हजार 404 शेतकरी प्रशिक्षित झाले आहेत, अशी माहिती मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे यांनी दिली.
भीमाशंकर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादन वाढीच्या मांजरी येथील प्रशिक्षणासाठी सहभागी होणाऱ्या महिलांना पारगाव कारखाना येथे शुभेच्छा देतेवेळी ते बोलत होते. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर, रामचंद्र ढोबळे, बाळासाहेब घुले, संदिप मोरडे, सोमेश्वर दीक्षित, संतोष थोरात, किरण गरुड उपस्थित होते.
कुरकुटे म्हणाले की, उसाची व साखरेची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक ऊस शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहीत होणे आणि प्रत्यक्ष त्याचा वापर शेतीमध्ये होणे ही काळाची गरज आहे. या उद्देशाने मागील 29 वर्षांपासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने प्रत्येक वर्षी ऊस उत्पादक पुरुष शेतकऱ्यांसाठी ऊस शेती ज्ञानयाग व महिला शेतकऱ्यांसाठी ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्राम राबविले जात आहे.
प्रशिक्षणाची व्याप्ती वाढावी तीन वर्षांपासून दोन टप्प्यात (जून-जुलै आणि नोव्हेंबर-डिसेंबर) महिन्यांत प्रशिक्षण घेण्यात येत आहे. यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबरला हे प्रशिक्षण होत आहे. ऊस शेती ज्ञानयाग या कार्यक्रमाचे हे 19 वे वर्ष असून ऊस शेती ज्ञानलक्ष्मी या कार्यक्रमाचे हे 14 वे वर्ष आहे.