पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य शासनाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडचा खर्च मागील तीन वर्षांत सुमारे 20 हजार 375 कोटींनी वाढला असल्याचे दिसून आले आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याच रिंगरोडच्या कामासाठी ४२ हजार ७११ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. रिंगरोडच्या खर्चात दुपटीने वाढ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीने रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. एमएसआरडीसीने रिंगरोडचे काम दोन टप्प्यांत हाती घेतले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
त्यामध्ये सहा कंपन्या पात्र ठरल्या आहेत. या कंपन्यांनी रस्त्याच्या कामांचे पूर्वगणनपत्रकातील (इस्टिमेट) रकमेपेक्षा चाळीस ते पंचेचाळीस टक्के जादा दराने निविदा भरल्या आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया वादग्रस्त ठरली.
निविदांची छाननी करण्यासाठी एमएसआरडीसीने तीन त्रयस्थ संस्थांची नेमणूक केली होती. त्या कंपन्यांनी सादर केलेल्या अहवालातही जादा दराने निविदा भरल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते.
त्यामुळे एमएसआडीसीकडून फेरनिविदा प्रक्रिया राबविली जाण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. प्रत्यक्षात तसे न घडता राज्य सरकारने रिंगरोडच्या सुधारित खर्चास मान्यता दिली आहे.
त्या तीन मोठ्या कंपन्यांची निविदा
रिंगरोडच्या कामासाठी ज्या कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. त्यामध्ये देशभरात गाजत असलेल्या कथित निवडणूक रोखे घोटाळ्यात नावे पुढे आलेल्या तीन मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. या तिन्ही कंपन्यांनी सर्वाधिक पॅकेजसाठी निविदा भरल्या आहेत.
पूर्व रिंगरोड
रिंगरोडच्या पूर्व भागातील ऊर्से – सोलू ते सोरतापवाडी या रस्त्याच्या कामासाठी २०२१ मध्ये १० हजार १५९ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती.
याच रस्त्याच्या कामासाठी आज १९ हजार ९३२ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली. त्यामुळे पूर्व भागाच्या रिंगरोडच्या कामात ९ हजार ७७३ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
पश्चिम रिंगरोड
पश्चिम भागातील ऊर्से ते वरवे बुद्रुक या रस्त्याच्या कामासाठी १२ हजार १७६ कोटी रुपयांचा खर्चास मान्यता देण्यात आली होती.
आजच्या बैठकीत याच रस्त्यासाठी २२ हजार ७७८ कोटी रुपयांच्या सुधारित कामास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या भागाच्या रस्त्याच्या कामात तीनच वर्षांत १० हजार ६०२ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
पूर्व रिंगरोडचार टप्पे
पहिला टप्पा – ११.८५ कि.मी
दुसरा टप्पा – १३.८0 कि.मी
तिसरा टप्पा – २१.२० कि.मी
चौथा टप्पा -२४.५० कि.मी
पश्चिम रिंगरोड पाच टप्पे
पहिला टप्पा – १४ कि.मी
दुसरा टप्पा – २० कि.मी
तिसरा टप्पा – १४ कि.मी
चौथा टप्पा -७.५० कि.मी
पाचवा टप्पा -९.३० कि.मी