सांगली (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, तासगाव, पलूस , खानापूर या तालुक्यांमधील 20 जणांना करोनाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 242 वर पोहोचली आहे. यातील 113 जणांवर मिरजेच्या करोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिळे, शेटफळे, मालेवाडी आणि विटा रोड येथील चौघांनी करोनावर मात केल्याने त्यांना 188 घरी सोडण्यात आले.
वाटेगाव (ता. वाळवा) येथील 50 वर्षांचा पुरुष, येलूर (ता. वाळवा) येथील 45 वर्षांची महिला, इस्लामपूर (ता. वाळवा) येथील 42 वर्षांचा पुरुष, गव्हाण (ता. तासगाव) येथील 50 वर्षांची महिला, मांजर्डे (ता. तासगाव) येथील 45 वर्षांचा पुरुष, दुधोंडी (ता. पलूस) येथील 7 व 9 वर्षांची दोन मुले, कवठेमहांकाळ येथील 55 वर्षांचा पुरुष, अंकले (ता. जत) येथील 66 वर्षांचा पुरुष, भाळवणी (ता. खानापूर) येथील 57 वर्षांचा पुरुष व 53 वर्षांची महिला, मणदूर (ता. शिराळा) येथील 38 व 35 वर्षे वयाचे दोन युवक, मणदूर (ता. शिराळा) 25 वर्षांचा पुरुष, 45 व 25 वर्षे वयाच्या महिला, 15 वर्षांची मुलगी, 11 वर्षांचा मुलगा, असे 20 जण करोनाबाधित असल्याचे रविववारी स्पष्ट झाले.
गव्हाण, मांजर्डे, दुधोंडी, कवठेमहांकाळ व अंकले येथे पाच कन्टेनमेंट झोन करण्यात आले आहेत. साळसिंगे (ता. खानापूर) येथील 60 वर्षांचा वृद्ध, कदमवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील 50 वर्षांची महिला, विटा येथील 34 वर्षांचा युवक व वांगी (ता. कडेगाव) येथील 69 वर्षांच्या पुरुषाची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 121 जणांनी करोनावर मात केली आहे.