Pune Crime : इस्टेट एजंटकडून 20 लाखाची खंडणी उकळणारे दोघे ‘जेरबंद’

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कोंढवा परिसरात केली कारवाई

पुणे – जीवे मारण्यासाठी 50 लाखांची सुपारी घेतल्याचा बनाव करुन इस्टेट एजंटाकडून 20 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी कोंढवा परिसरामध्ये शनिवारी करण्यात आली.

सागर दत्तात्रय फडतरे (वय 29, रा. बोपगाव, पुरंदर), गणेश दत्तात्रय फडतरे (वय 29, रा. बोपगाव, पुरंदर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा येथील एका जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा कोंढवा परिसरामध्ये जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यास काही दिवसांपुर्वी एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यावेळी “तुमची 50 लाखांची सुपारी मिळाली असून जीव वाचवायचा असेल, तर 20 लाख रुपये द्या’ अशी मागणी केली.

त्यानंतरही आरोपीने तक्रारदाराला सातत्याने फोन करून त्यांच्याकडे खंडणीसाठी तगादा लावला. या प्रकारामुळे व्यावसायिकाने थेट पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे (पूर्व विभाग) याबाबत तक्रार केली.

पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन शुक्रवारी कोंढवा परिसरातील तक्रारदाराच्या कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदाराने सांगितल्यानुसार, आरोपी 20 लाख रुपयांची खंडणी घेण्यासाठी तक्रारदाराच्या कार्यालयात आला. त्याने तक्रारदाराकडून 20 लाखांची खंडणी घेतली. त्याचवेळी परिसरात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याचा मित्र गणेश फडतरे हा देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्यालाही अटक केली. संबंधीत तरुणांकडून आणखी काही नागरीकांना याच पद्धतीने खंडणी मागितल्याची शक्‍यता आहे, त्यामुळे अशा नागरीकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले.

अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, अंमलदार सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, विनोद साळुंखे, प्रदिप शितोळे, राहुल उत्तरकर, विजय गुरव, शैलेश सुर्वे, संग्राम शिनगारे व प्रविण पडवळ यांच्या पथकाने केली. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.