कराची – पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका निर्मनुष्य रेल्वे क्रॉसिंगवर भरधाव वेगाने येणाऱ्या एका रेल्वे गाडीची क्रॉसिंगवरून जाणाऱ्या एका प्रवासी बसला धडक बसून झालेल्या अपघातात 20 जण ठार झाले तर अन्य अनेक जण जखमी झाले.
शुक्रवारी कंधरा रेल्वे क्रॉसिंग जवळ हा प्रकार घडला. ही रेल्वे गाडी रावळपिंडीवरून कराचीकडे येत होती तर नेमकी एक प्रवासी बस त्या क्रॉसिंगवरून जात होती. मृतांमध्ये मुलांचाही समावेश आहे. बस मध्ये 50 हून अधिक प्रवासी होते. ते पंजाब प्रांतातील सुक्कुर गावाकडे चालले होते.
ही धडक इतकी जबरदस्त होती की बसचे चक्क तीन तुकडे झाले आहेत. तसेच ही बस रेल्वेच्या इंजिनने दीडशे ते दोनशे फूट फरफटत नेली. अपघातातील जखमींना रोहरी आणि सुक्कुर येथील रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बस चालकाच्याच बेफिकीरीमुळे घडला असे तेथील काहीं रेल्वे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. पाकिस्तानातील तब्बल 2470 रेल्वे क्रॉसिंग असुरक्षित आहेत. तेथे कोणीही गार्ड तैनात नाही.