Balochistan News – पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात एका शटल रेल्वेमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या भीषण स्फोटामध्ये किमान २० जण ठार झाले आणि तब्बल ७० जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा स्फोट आज सकाळच्या सुमारास क्वेट्टा रेल्वे स्थानकाच्या चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ घडला. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनिफ अब्बासी यांनी स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या शटल रेल्वेमध्ये काही प्रवासी देखील होते आणि स्फोटामुळे रेल्वे इंजिन आणि तीन डब्ब्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. ही शटल रेल्वे क्वेट्टा कॅन्टोन्मेंट स्थानकापासून सिटी रेल्वे स्थानकाकडे जात असताना हा स्फोट झाला, असे अब्बासी यांनी सांगितले. या स्फोटात किमान २० जण ठार झाले आणि ७० जण जखमी झाल्याचे पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी आणि अन्य वेबसाइटनी म्हटले आहे. पाकिस्तानने बंदी घातलेल्या बलुच लिबरेशन आर्मीने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. या रेल्वेमधून लष्करी कर्मचाऱ्यांना क्वेट्टा कॅन्टोन्मेंट येथून नेले जात होते. म्हणून हा हल्ला केला गेला, असे बीएलएच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. या स्फोटाबाबत माध्यमांना जी काही माहिती द्यायची असेल, ती सरकारी अधिकारीच देतील. मात्र स्थानिक पोलिसांनी माध्यमांना कोणतेही निवेदन देऊ नये, अशी सूचना असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. या स्फोटाचा आवाज आणि परिणाम इतका मोठा होता की त्यामुळे जवळपासच्या वाहनांच्या काचा आणि इमारतींची काचेची तावदानेही फुटली. या रेल्वेमधून प्रवाशांना सिटी रेल्वे स्थानकात नेले जात होते. तेथून दुसऱ्या रेल्वेने हे प्रवासी ईदच्या सुटीनिमित्त आपल्या मुळगावी जाणार होते. पेशावरकडून क्वेट्टाकडे जाणारी जाफर एक्सप्रेस खबरदारीची उपाययोजना म्हणून क्वेट्टा रेल्वे स्थानकातच थांबवून ठेवल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. क्वेट्टा शहरात झालेल्या स्फोटानंतर सर्व संबंधित संस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते बाबर युसुफझाई यांनी सांगितले. सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन पथकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय बचाव कार्य करू देण्यासाठी, लोकांनी स्फोटाच्या ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहनही त्यांनी केले. बलुच दहशतवाद्यांकडून हल्ल्यांच्या अनेक घटना… नोव्हेंबर २०२१ मध्ये क्वेट्टा रेल्वे स्थानकात झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये ३२ जण ठार आणि अनेक जण जखमी झाले होते. जाफर एक्सप्रेसला यापुर्वी बलुच बंडखोरांनी अनेकवेळा लक्ष्य केले असून रेल्वेमार्गावर स्फोट घडवण्याच्या घटनांमुळे काही महिन्यांसाठी ही रेल्वे बंद ठेवावी लागली होती. जाफर एक्सप्रेसचे अपहरण करून पाक सैन्याच्या सैनिकांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्नही बलुच दहशतवाद्यांनी पुर्वी केला होता.