पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मराठवाडा मित्रमंडळ संचालित फाउंडेशन फॉर मेकइटहॅपन सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशनने (एफएमसीआयआयआय) इन्क्युबेट केलेल्या स्टार्टअपला स्मार्ट मीटरच्या उत्पादनासाठी “फिल्टरम एलएलपी’ या संस्थेकडून वीस कोटींची भागीदारी केली आहे, अशी माहिती मराठवाडा मित्रमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव किशोर मुंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय गोहोकर, एफएमसीआयआयआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर तलाठी, स्मार्ट मीटर स्टार्टअपचे व्यंकटेश शेटे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे आदी उपस्थित होते.
मराठवाडा मित्रमंडळ संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन, इन्व्हेंशन, स्टार्टअप संस्कृती व उद्योजकतेची भावना रुजावी, या उद्देशाने “एफएमसीआयआयआय’ची स्थापना करण्यात आली.
आजवर अनेक स्टार्टअपचे यशस्वीरीत्या उद्योगांमध्ये रूपांतर झाले आहे. स्मार्ट मीटरच्या या स्टार्टअपला तब्बल वीस कोटींची गुंतवणूक मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे, असे भाऊसाहेब जाधव यांनी सांगितले.
कल्पना, विकास आराखडा, अर्थसहाय्य व उत्पादन अशा चार टप्प्यांमध्ये स्टार्टअपचे यश आहे. सॅट-स्मार्ट प्रीपेड एनर्जी मीटर, पेट्स अँड मी, सायटस हेल्थकेअर-इलेक्ट्रॉनिक विटनेस सिस्टीम विथ एआय, व्हीज गिजमो-होम ऍटोमेशन,
वाट बघतोय रिक्षावाला अॅप, इलेपोर्ट-ईव्ही फॉर ट्रान्सपोर्ट यासह अन्य काही स्टार्टअप यशस्वी झाले आहेत. जवळपास दीड कोटींचा निधी या स्टार्टअपसाठी दिला गेला आहे.
इंटरनेट ऑफ थिंग्ज, संशोधन व विकास, शिक्षण व प्रशिक्षण, उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, सेवा, पुनर्विकास, कार्बन उत्सर्जन, हरित ऊर्जा, कृषी या क्षेत्रातील जवळपास ७४ स्टार्टअप सध्या “एफएमसीआयआयआय’मध्ये सुरू आहेत. ड्रीम्स रिडेव्हलप्ड आणि शेटे अॅडवान्सड टेक्नॉलॉजी (स्मार्ट मीटर) या दोन स्टार्टअपना निधी भागीदारी स्वरूपात मिळाला आहे, असे डॉ. चंद्रशेखर तलाठी यांनी स्पष्ट केले आहे.
“एफएमसीआयआयआय’ची ठळक वैशिष्ट्ये:
– टाटा टेक्नॉलॉजीज आणि सायन्स टेक्नॉलॉजी पार्कचे सहकार्य
– विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण व मार्गदर्शन
– एकाचवेळी ५० स्टार्टअप्सना विकसित करण्याची क्षमता
– नावीन्यपूर्ण कल्पना, सेवा देण्यासाठी, स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी सक्षम पाठिंबा
– तांत्रिक, जैव, आर्थिक, कृषी व औषधनिर्माण आदी स्टार्टअपना प्रोत्साहन