मेखळीत रेस्क्यु टीमने मोहीम
बारामती – बारामती तालुक्याच्या पूर्व पट्यातील मेखळी परिसरात (ता.१४) रोजी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून कऱ्हा व नीरा नदीला महापूर आला आहे. सोनगाव येथील सोलनकर वस्तीवरील पुराच्या पाण्यात अडकलेल्या शोभा विशाल सोलनकर व त्यांचा दोन महिन्याच्या बाळासह २० हून अधिक नागरिकांना रेस्क्यू टीमने अथक प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले.
सोनगाव येथे कऱ्हा आणि नीरा दोन्ही नद्यांचा संगम होत असल्याने या ठिकाणच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे गावातील ५० हून अधिक घरे पाण्यात होती. मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे कोणाचेही फोन लागत नव्हते. अशावेळी माजी सरपंच विकास माने यांनी आमदार रोहित पवार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यावर आमदार पवार यांनी तातडीने सूत्रे हलवली.
अवघ्या अर्ध्या तासात पोलिस यंत्रणा पोहचली. त्यानंतर रेस्क्यु टीमला पाचारण करण्यात आले. तत्काळ मदत मिळाल्याने बाळासह इतरांसमोर येणारा गंभीर प्रसंग टळला.
दरम्यान, बारामती तालुक्यात भीषण स्थिती आहे. प्रशासन जोमाने काम करीत असले तरी उपाययोजना तोकडी पडत आहे.