नवी दिल्ली -करोना फैलावावरून वादग्रस्त ठरलेल्या तबलिगी जमातच्या विरोधात पाऊले उचलण्याची प्रक्रिया दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे. त्यानुसार, मंगळवारी 82 परदेशी तबलिगी सदस्यांविरोधात येथील न्यायालयात आरोपपत्रं दाखल करण्यात आली.
दिल्ली पोलिसांनी 20 देशांचे नागरिक असणाऱ्या तबलिगींविरोधात 20 आरोपपत्रं दाखल केली. करोना फैलाव रोखण्यासाठी भारतात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन आणि व्हिसा नियमांचा भंग केल्याचे आरोप परदेशी तबलिगींवर ठेवण्यात आले आहेत.
दिल्लीत मार्चमध्ये तबलिगी जमातचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात परदेशी नागरिकांसह सुमारे 9 हजार सदस्य सामील झाले. त्यातील अनेकांनी नंतर भारताच्या विविध भागांत प्रवास केला. त्यांच्यातील अनेकांना करोनाची बाधा झाला होती.
तबलिगींच्या फैलावण्याने एप्रिलमध्ये देशातील करोनाबाधितांच्या संख्येत मोठी भर पडल्याचे आढळले. त्यामुळे वादग्रस्त ठरलेला मेळावा आणि तबलिगी सदस्य दिल्ली पोलिसांच्या रडारवर आले. त्यानंतर मार्चच्या अखेरीस तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना साद कंधलवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर फरार झालेला मौलाना अजूनही हाती लागलेला नाही.