राजे यशवंतराव होळकर योजनेबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती
रावणगाव – राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेच्या प्राथमिक निवड चाचणीमध्ये रावणगाव (ता. दौंड) येथील परिसरातील 20 मेंढपाळांची प्रकरणे मंजूर झाली आहेत, अशी माहिती दौंड तालुक्यातील पूर्व भागामधील पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्रातील मेंढपाळांची भटकंती थांबविण्याबरोबरच भटक्या जमाती “क’ प्रवर्गातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी तत्कालीन पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सुरू केलेल्या राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत दौंड तालुक्याच्या पूर्व भागातून प्राथमिक निवड चाचणीत 20 प्रकरणे मंजूर झाली आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजातील जवळपास एक लाख मेंढपाळांकडून मेंढी पालनाचा व्यवसाय केला जातो. त्यांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचविण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
या योजनेत दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील रावणगाव, बोरिबेल, गाडेवाडी, जिरेगाव, कौठडी, खोरवडी, मलठण, वाटलूज आदी गावांतून 20 प्रकरणे मंजूर झाली आहेत, तर संपूर्ण दौंड तालुक्यातून 600 लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.
संकेतस्थळावर संपर्क करावा
या मंजूर झालेल्या आणि प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे 23 तारखेपर्यंत ुुु.ारहराशीह.ले.ळप या संकेतस्थळावर जाऊन अपलोड करून त्याची प्रिंट काढून त्यावर संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेऊन ती प्रत पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग दौंड यांच्याकडे त्वरित जमा करावी लागणार आहेत. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना 75 टक्के शासकीय अनुदानातून 20 मेंढ्या आणि 1 नर मेंढा देण्यात येणार आहे, तरी जास्तीत जास्त मेंढपाळांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.