20 टक्‍के पाणी “लिकेज’

– स्काडा प्रणाली निरुपयोगी : विस्कळीत पाणी पुरवठा तक्रारींत वाढ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविण्याकरिता पवना धरणातून दररोज केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यापैकी 20 टक्के म्हणजेच 100 एमएलडी पाण्याची गळती (लिकेज) होत असल्याची धक्कादायक कबुली महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी कोट्यवधी रुपये खर्च केलेली “स्काडा’ प्रणाली निरुपयोगी ठरली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापौर राहूल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर दालनात मंगळवारी (दि. 28) बैठक पार पडली. या बैठकीला स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, नगरसेविका भीमाबाई फुगे, नगरसेवक तुषार कामठे, सागर गवळी, सहशहर अभियंता अयुबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते.

या बैठकीत शहराच्या पाणी पुरवठ्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अयुबखान पठाण यांनी शहराला दररोज 500 एमएलडी पाणी पुरवठा होत असतो. त्यापैकी पाणी गळतीमुळे 100 एमएलडी पाणी वाया जात आहे. त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत असल्याचे स्पष्ट केले. तसेच, शहराच्या क आणि इ प्रभाग कार्यालयांच्या हद्दीतील पाणी पुरवठा विस्कळीत असल्याच्या तक्रारी तुलनेत अधिक असल्याची माहिती कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी दिली.

दरम्यान, पाणी गळती अचुकपणे समजावी व त्यावर तत्काळ उपाययोजना करता यावी, याकरिता कोट्यवधी रुपये खर्चून रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रात महापालिकेने “स्काडा’ प्रणाली बसविली आहे. याचा कोणताही उपयोग ही पाणी गळती रोखण्यात झाला नसल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहराचा विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला.

शहरातील चिखली, जाधववाडी, वाकड आणि इतर भागांत सात ते आठ पाण्याच्या टाक्‍या (जलकुंभ) उभारण्याच्या कामाची “वर्क ऑर्डर’ देण्यात आली असून, लवकरच या जलकुंभाचे काम सुरु केले जाणार असल्याची माहिती महापौर जाधव यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय भामा-आसखेड व आंद्रा धरणातील राखीव कोटा असलेले पाणी शहराला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याकरिता आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाणारे पाणी देहू बंधाऱ्यातून उचलून ते चिखलीतील नियोजित जलशुद्धीकरण प्रकल्पात आणण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातून रावेत बंधाऱ्यापर्यंत टाकल्या जाणाऱ्या बंद जलवाहिनी प्रकल्पाचे काम सुरु करण्यास राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे. तसेच या प्रकल्पाला विरोध असलेल्या नागरिकांच्या मागण्या सोडविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून, त्यामध्ये बऱ्याचअंशी यश आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल.
– राहुल जाधव, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)