बैरुत- लेबेनॉनमधील संयुक्त राष्ट्राच्या दूतावासाच्या मुख्यालयामध्ये आज झालेल्या स्फोटात संयुक्त राष्ट्राचे २ शांती सैनिक जखमी झाले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या दूतावासाच्यावतीने ही माहीती देण्यात आली. काल देखील इस्रायलच्यावतीने संयुक्त राष्ट्राच्या दूतावासाच्या याच परिसरामध्ये रॉकेटचा मारा करण्यात आला होता.
लेबेनॉनच्या दक्षिणेकडील नाकोर शहरातील मुख्यालयातील निरीक्षण टॉवरजवळ हे स्फोट झाले, असे युनिफिल नावाच्या संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीने म्हटले आहे. जखमी शांती सैनिकांपैकी एकाला जवळच्या टायर शहरातील रुग्णालयात नेण्यात आले, तर दुसऱ्यावर घटनास्थळी उपचार करण्यात आले. स्फोटांचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.
इस्त्रायली सैन्याच्या बुलडोझरने दक्षिण लेबनॉनमधील आणखी एका ठिकाणाला देखील धडक दिली, तर इस्त्रायली रणगाडे या ठिकाणांच्या जवळ पोचले आहेत. स्थिती मजबूत करण्यासाठी अतिरिक्त शांतीरक्षक पाठवले गेले आहेत, असेही या निवेदनात म्हटले गेले आहे.