देहूरोड पोलिसांची कारवाई : आठवड्याभरातील दुसरी कारवाई
देहूरोड – रावण टोळीच्या सराइतांना दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून देहूरोड पोलिसांनी अटक करून दोघांकडून दोन गावठी पिस्तुलासह तीन जिवंत काडतुस जप्त केली. आठवड्याभरातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रसन्ना ऊर्फ सोनू ज्ञानेश्वर पवार (वय 24, रा. गोडूंब्रे, ता. मावळ) आणि हितेश ऊर्फ नाना सुनील काळे (वय 25, रा. किन्हई गाव, देहूरोड) असे अटक केलेल्या रावण टोळीशी संबंधितांची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सव, निवडणूक आचारसंहिता या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पोलीस सहआयुक्त प्रकाश मुत्याल, सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे सहायक पोलीस निरीक्षक शाहीद पठाण, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, किरण कणसे, गणेश गायकवाड यांच्या पथकाचे दोन वेगवेगळ्या पथकाने गस्तीवर असताना पोलीस शिपाई किशोर परदेशी याला अमरदेवी मंदिराजवळ दरोडा आणि आर्म ऍक्टच्या देहूरोड व तळेगाव पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात असणारा प्रसन्ना येणार असल्याची माहिती मिळली.
पोलीस पथकाने सापळा लावून दोघांना अटक केली. दोघांकडून दोन गावठी पिस्तुलासह तीन जिवंत काडतुस जप्त केली. आठवड्याभरात रावण टोळीतील अशोक उत्तेश्वर कसबे याच्यासह तीन पिस्तूल जप्त केले आहे.