गडचिरोलीत 2 महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली – गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्‍यातील कुंडूरवाहीच्या जंगलात पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. नक्षलवाद्यांनी पोलीस अभियानावर भुसुरुंगस्फोट घडवून हल्ला केला. मात्र यात जवानांचे कोणतेही नुकसान झाले नाही. या हल्ल्यानंतर पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिले असून, 2 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रामको नरोटी आणि शिल्पा ध्रुवा असे या ठार मारण्यात आलेल्या दोन महिला नक्षलवाद्यांचे नाव आहे. भामरागड तालुक्‍यातील कोठी पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या गुंडूरवाही गावानजीकच्या टेकडीजवळ सी-60 जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. याच दरम्यान दुपारी 1 वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. सुदैवाने या स्फोटात पोलीस विभागाची कोणतीही हानी झाली नाही. यानंतर उडालेल्या चकमकीत 2 दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, त्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाआधी पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा रामको नरोटी ही सुत्रधार होती. तिच्यावर 12 खुनासह 45 गुन्हे दाखल आहेत. रामकोवर 12 लाखांचे बक्षिस होते. ती नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीची सदस्य देखील होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.