राज्यात 2 लाख 24 हजार दिव्यांग मतदार

मुंबई – राज्यात यंदा दिव्यांग मतदारांची संख्या 2 लाख 24 हजार 162 इतकी आहे. यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले 37 हजार 324, मूकबधीर 24 हजार 77, शारीरिक अपंगत्व असलेले 1 लाख 8 हजार 22, तर इतर अक्षमता असलेले 54 हजार 39 दिव्यांग मतदार आहेत.

दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने यंदा मोठा पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात 3 डिसेंबर 2018 रोजी दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच अपंग कल्याण आयुक्तालय यांचीही या कामी मदत घेण्यात येत आहे. त्यांच्या सहाय्याने यंदा दिव्यांग मतदारांची विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली.

अपंगांना मतदान केंद्रांवर आवश्‍यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश निवडणूक आयोगामार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या सर्व सुविधांबाबत निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांना विविध प्रशिक्षणांमध्ये अवगत करण्यात आले आहे. दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावर सुकाणू समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हील चेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग आदी सुविधा असणार आहेत. याशिवाय मागणीनुसार मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

दिव्यांगांसाठी ऍप
दिव्यांगांची मतदारनोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी पीडब्ल्यूडी हे ऍप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे मोबाईल ऍप डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या ऍपवर जाऊन मागणी केल्यास दिव्यांग मतदारांना प्रशासनामार्फत व्हीलचेअर तसेच मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)