मुंबई : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कधी आपल्या चुकीमुळे तर कधी दुसऱ्याच्या चुकीमुळे हे अपघात होताना दिसतात. असाच एक अपघात नवी मुंबईमध्ये घडला आहे. यामध्ये २ तरुणींना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये एकीचा जागीच तर दुसरीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संस्कृती खोकले (वय 22) व अंजली पांडे (वय 19) अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवतींची नावे आहेत.
काय घडले नेमके?
सकाळी पावणे सातच्या दरम्यान आपली रात्रपाळी करून अंजलीला बोनकोडे गावात सोडण्यास संस्कृती येत होती. बोनकोडे जवळ असणाऱ्या वीरशैव स्मशान भूमीनजिक त्या आल्या असता समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. अपघात झाल्यावर कारचालक त्यांची मदत न करता निघून गेला. यात दुचाकीचालक संस्कृती जागीच ठार झाली तर अंजलीला आसपासच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बोनकोडे गावाकडे जाणाऱ्या पाम बीच रोडवर स्कोडा कारने या तरुणींच्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात मरण पावलेली संस्कृती कामोठे सेक्टर १८ मधील रहिवासी होती. तर, अंजली कोपरखैरणेमधील बोनकोडे गावात राहत होती. तुर्भे एमआयडीसीमध्ये रात्रीची शिफ्ट संपवून या दोघी घरी जात होत्या. संस्कृती अंजलीला तिच्या घरी सोडून कामोठ्याला जाणार होती. मात्र त्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारचा नंबर व त्या चालकाला शोधण्यासाठी आम्ही परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चित्रित केलेलं फूटेज तपासत आहोत, असे एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी सांगितले. सध्या अज्ञात आरोपीविरोधात कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) व १०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.