अमरावती : अमरावतीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आलीआहे. या अपघातात कॉलेजवरून घरी जाताना 2 जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
काय घडले नेमके?
अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा ते देऊरवाडा वळणावर हा भीषण अपघात झाला. अतिवेगामध्ये आलेल्या टूव्हीलर एकमेकावर आदळल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये चार तरुण गंभीर जखमी झाले होते. यामधील दोघांचा अतिरक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर इतर २ जखमींना उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुणाल नरेश भुते (वय 18 वर्ष रा. देऊरवाडा) आणि शेख मुस्ताक शेख गैसूद्दीन (वय 32 वर्षे रा. देऊरवाडा) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. तर विनोद रामकृष्ण फिसके (वय 35 वर्षे रा. देऊरवाडा) आणि सारंग नामदेव संभे (वय 18 वर्षे रा. शिरजगाव कसबा) हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. या अपघातामुळे घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.