राष्ट्रध्वजाच्या देखभालीसाठी दोन कोटींचा खर्च

मागविली फेरनिविदा ः निगडीतील 107 मीटर उंचीचा तिरंगा

पिंपरी  – निगडी येथील भक्‍ती-शक्‍ती उद्यानातील 107 मीटर उंच राष्ट्रध्वजाच्या देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी महापालिका दोन कोटी 5 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. तीन वर्ष कालावधीसाठी हे काम ठेकेदारी तत्त्वावर देण्यात येणार आहे. त्यासाठी फेरनिविदा मागविण्यात आली आहे. सध्या पावसाळा असल्याने ध्वजस्तंभावरून राष्ट्रध्वज खाली उतरविण्यात आलेला आहे.

पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर (15 ऑगस्ट वगळता) या चार महिन्यांच्या कालावधीत पावसात राष्ट्रध्वज भिजून फाटतो. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यांचा कालावधी वगळता उर्वरित आठ महिन्यांमध्ये म्हणजे 1 ऑक्‍टोंबर ते 31 मे या कालावधीत राष्ट्रध्वज फडकावण्याचा निर्णय झालेला आहे. भक्‍ती-शक्‍ती उद्यानातील ध्वजस्तंभाची उंची 107 मीटर इतकी आहे. तर, फडकाविण्यात येणारा ध्वज हा 90 फूट बाय 60 फूट आकाराचा आहे.

निविदेतंर्गत विद्युतविषयक आणि यांत्रिकी कामांचा समावेश असणार आहे. त्याशिवाय, राष्ट्रध्वज फाटल्यानंतर तो बदलण्याची देखील जबाबदारी ठेकेदाराची असेल. त्याशिवाय, राष्ट्रध्वज उतरविणे आणि चढविणे यासाठी लागणारे मनुष्यबळ ठेकेदारानेच उपलब्ध करायचे आहे. राष्ट्रध्वजाच्या सुरक्षेचे नियोजन देखील संबंधित ठेकेदारालाच करावे लागणार आहे. तीन वर्षांसाठी हे काम दिले जात असले तरी प्रत्येक वर्षातील चार महिने राष्ट्रध्वज फडकावला जाणार नाही. त्यामुळे आपोआपच राष्ट्रध्वजाच्या देखभाल-दुरूस्तीच्या कामाची जबाबदारी ठेकेदाराला चार वर्ष पाहावी लागणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय खाबडे यांनी दिली.

राष्ट्रध्वजाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी यापूर्वी निविदा काढली होती. त्यासाठी तीन ठेकेदारांपैकी एकच ठेकेदार पात्र ठरला. त्यामुळे स्पर्धा न झाल्याने पुन्हा फेरनिविदा मागविली आहे.

– संजय खाबडे, कार्यकारी अभियंता, महापालिका.

Leave A Reply

Your email address will not be published.