गोळीबार करत 2 कोटींचे दागिने लुटले

कोथरूडमधील घटना : थरार सीसीटीव्हीत कैद

पुणे – कोथरूडमधील आनंदनगर परिसरातील पेठे ज्वेलर्समध्ये दोघा चोरट्यांनी धुमाकूळ घातला. गोळीबार करत लाखो रुपयांचे दागिने लुटले. दुकानात ग्राहक असताना आणि भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत तपासाला सुरुवात केली आहे. सीसीटीव्हीमध्ये हा थरार कैद झाला असून पोलिसांची पथके गुन्हेगारांच्या मागावर रवाना झाली आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

याप्रकरणी पराग पेठे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी 500 ते 600 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1 किलो इमिटेशन ज्वेलरी चोरली. त्यावर साधारणपणे 200 ग्रॅम सोन्याची पॉलिश आहे. या सर्वांची बाजारभावानुसार सव्वादोन कोटी इतकी किंमत असू शकते.

कोथरूड परिसरात आनंदनगर भागात मुख्य चौकात पेठे ज्वेलर्स आहे. येथे ग्राहक असल्याचा बहाणा करत दोघे 4 वाजून 35 मिनिटांनी दुकानात घुसले. त्यांनी कंबरेला लावलेले पिस्तूल बाहेर काढून दुकान मालक आणि कामगारांना धमकावत दुकान लुटण्यास सुरुवात केली. कामगारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता एकाने गोळी झाडली. त्यानंतर दुसरी गोळीही झाडण्यात आली. यानंतर दोघांनी दागिने चोरून पळून गेले.

काउंटरवरून झाडल्या गोळ्या
दोघा आरोपींनी सराफी दुकानाच्या काउंटरवर दोन गोळ्या झाडल्या. यामुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना काउंटरवर लावलेले दागिने काढून दिले. हे दागिने त्यांनी पटापट पिशवीमध्ये भरून दुचाकीवरून पळ काढला. साधारण 500 ते 600 ग्रॅम वजनाचे दागिने चोरण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.