सोमवारी मिळाले गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक उत्पन्न
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) तिजोरीत सोमवारी 1 कोटी 90 लाख उत्पन्न जमा झाले. मागील तीन वर्षांतील सर्वाधिक उत्पन्न मिळाल्याने पीएमपी राबवित असलेल्या विविध योजनांचा फायदा मिळाला आहे.
पीएमपीचे प्रतिदिन सरासरी उत्पन्न सुमारे 1 कोटी 45 लाखांपर्यंत असते. परंतु, सोमवारी पीएमपीने उच्चांकी उत्पन्न गाठत 2 कोटींच्या जवळपास मजल मारली. सोमवारी सुमारे 1,650 बस संचलनात होत्या. मागील महिनाभरापासून संचलनावर वाहतूक विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे.
वाहतूक विभागाचे व्यवस्थापक अनंत वाघमारे म्हणाले, पीएमपीचे रुट बोर्ड सुस्थितीत ठेवणे, चालक-वाहकांच्या गणवेशांची पाहणी, डेपोला अचानक भेट देऊन विविध विभागांची पाहणी सुरू केली आहे. तसेच, चेकरांची संख्या वाढविल्याने मोफत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. मागील 15 दिवसांपासून रात्रीच्या वेळेला डेपोत जाऊन बेशिस्तपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गस्ती पथकाची कारवाई सुरू असून पीएमपीने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा फायदा होत आहे. तसेच, गेल्या तीन वर्षांतील 1 कोटी 90 लाख हे एकाच दिवसातील सर्वाधिक उत्पन्न पीएमपीचे चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जमा झाले आहे.