मुंबई\ (प्रतिनिधी) – करोनाविरोधातील लढ्यासाठी राज्यात टाळेबंदी असतानाही या कालावधीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांना राज्य उत्पादन शुल्क आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. लॉकडाउन काळात उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करीत 3 एप्रिलपर्यंत राज्यात 2 काटी 82 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासंदर्भात एकूण 1221 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर 36 वाहने जप्त केली असून 472 आरोपींना अटक करण्यात आले आहे.
टाळेबंदीच्या काळात शेजारील राज्यांमधून महाराष्ट्रात अवैध दारूची होणारी तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग 24 तास कार्यरत आहे. त्यानुसार नाकाबंदी केली असून गोवा, दादरा- नगर हवेली, दीव- दमण, कर्नाटक व मध्य प्रदेश राज्यातून अवैध मद्य येणार नाही याकरिता 12 कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी तपासणी करीत आहेत. तसेच 18 तात्पुरते सीमा तपासणी नाके देखील उभारण्यात आले आहेत.
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 18008333333, व्हाट्सअँप क्रमांक 8422001133 देण्यात आला आहे.