पुणे विद्यापीठात धावणार २ सीएनजी बसेस

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सीएनजीवर चालणाऱ्या 24 सीटर बसेस खरेदी करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. या बसेसमुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसरामध्ये फिरता येणार आहे. या बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू झाली असून, या बसेस लवकरच धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विद्यापीठाला या बसेस महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या “सीएसआर’ फंडच्या माध्यमातून 18 लाख किंमतीच्या दोन बसेस मिळणार आहेत. अंतर्गत वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने ही पावले उचलली आहेत. या बसेस किमान 12 तास विद्यापीठ परिसरामध्ये सुविधा पुरविणार असून याचा अधिक फायदा विद्यार्थिनींना होणार आहे.

विद्यापीठ गेटवरून विद्यापीठाच्या मुख्य इमारत, परीक्षा विभाग आणि विविध विभागांपर्यंत जाण्यासाठी विद्यापीठांतर्गत वाहन सुविधा नसल्याने विद्यार्थी आणि येणाऱ्या नागरिकांना खासगी वाहन अथवा रिक्षाचा वापर करावा लागतो. मात्र रिक्षाचालक मनमानी करत वाटेल ते भाडे आकारतात. यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे बस दाखल झाल्यानंतर रिक्षाचालकांच्या आडमुठेपणाला आळा बसणार असल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर सीएनजी बसेसद्वारे विद्यापीठाच्या आवारात पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनावर धावणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची पातळी कमी होण्याची शक्‍यता तज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.