पिंपरी (प्रतिनिधी) – डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी सायबर चोरट्याने दिघीतील एकाची दोन कोटी ४५ लाख ३० हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाने गुजरातमधून आरोपीला अटक केली. निकुंज अश्विनभाई मकवाना (रा. विक्रमनगर, पुनागाम, सुरत, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथील फिर्यादीला आरोपी निकुंज याने एका व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये मध्ये सहभागी केले. या ग्रुपमध्ये शेअर मार्केट संदर्भात टिप्स देण्यात येत होत्या. तसेच ग्रुपमधील इतर व्यक्ती त्यांना दररोज होत असलेल्या प्रॉफिटचे फोटो ग्रुपवर पाठवित होते.
त्यामुळे फिर्यादींनीही ग्रुपच्या अॅडमिन सोबत संपर्क साधुन पैसे गुंतवणुक करण्याची इच्छा व्यक्त केली. आरोपीने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक करण्यासाठी वेगवेगळे बँक अकाऊंट देऊन त्यावर एकुण २ कोटी ४५ लाख ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केल्याबाबतचा गुन्हा दिघी पोलीस ठाण्यात दाखल झाला.
या गुन्हयाचा समांतर तांत्रिक तपास सायबर सेल करीत होते. सायबर सेलने बँक अकाऊंट व इतर तांत्रिक विश्लेषण करीत हे बँक अकाऊंट सुरत, गुजरातमधील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सायबर सेलचे पथक गुजरातमध्ये गेले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी राधे इंटरप्रायजेस या नावाने अकाऊंट असलेला अकाऊंटधारक निकुंज याला अटक केली. सायबर सेलने त्याच्याकडे तपास केला असता त्याने हा गुन्हा व्यवसायात झालेल्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी केला असल्याची कबुली दिली.
ही कामगरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, रविंद्र पन्हाळे, अंमलदार दिपक भोसले, अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले यांच्या पथकाने केली आहे.
त्या खात्याबाबत ५६ तक्रारी !
आरोपी निकुंज याने गुन्हयात वापरलेल्या बँक अकाऊंट विरुध्द संपूर्ण भारतभरातुन ५६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच निकुंजच्या या बँक खात्यातून एकूण चार कोटी २९ लाख ४९ हजार ५८५ रुपयाची उलाढाल झाली असल्ण्याचे सायबर पोलिसांनी सांगितले