जिल्ह्यात 2 हजार 354 पीक कापणीचे प्रयोग

पुणे – पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसान भरपाई निश्‍चित करण्यासाठी जिल्ह्यात पीककापणी प्रयोग घेतले जाणार आहेत. चालू वर्षीच्या खरीप हंगामात पीकविमा योजनेंतर्गत मंडळनिहाय गटांमध्ये प्रत्येक पिकासाठी किमान 12 प्रयोग घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे जिल्हाभरातील पीक लागवडीनुसार 2 हजार 354 प्रयोग केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. खरीप हंगामात 2109-20 अंतर्गत पुणे जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग हे पीकविमा नुकसान भरपाई करण्यासाठी आवश्‍यक आहेत. त्यामुळे पीक कापणी प्रयोग अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्‍यक आहे.

विहित कालमर्यादेत हे प्रयोग करून त्याची माहिती पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत केंद्र सरकारला सादर करावी लागते. हे पीक कापणीचे प्रयोग महसूल, ग्रामविकास व कृषी या तीनही विभागांमार्फत केले जातात. कृषी विभागाला पीक उत्पन्नाची अचूक आकडेवारी वेळेत उपलब्ध होण्याकरिता पीक कापणीचे नियोजन, अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुक्‍यात समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका विकास अधिकारी, ग्रामीण बॅंकांचे तालुका प्रतिनिधी व मिवमा प्रतिनिधींचा समावेश आहे. तर ग्रामस्तरावरील समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील, सरपंच, उपसपंच व पीकविमा कर्मचाऱ्याचा समावेश आहे. पीक कापणी प्रयोगावेळी ग्रामस्तरावरील सदस्यांची उपस्थिती आवश्‍यक असते. तसेच, या प्रयोगासाठी कृषी विभागाचे मोबाइल ऍप बंधनकारक आहे.

प्रयोग करण्यात येणारे तालुके
हवेली 168, मुळशी 116, भोर 216, मावळ 138, वेल्हे 114, जुन्नर 132, खेड 300, आंबेगाव 176, शिरुर 288, बारामती 190, इंदापूर 182, दौंड 155 तर पुरंदर 179 प्रयोग केले जाणार आहेत.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×