नवी दिल्ली – व्याजदर उच्च पातळीवर असूनही प्रवासी वाहन विक्री वाढत आहे. अशा परिस्थितीत जानेवारी महिन्यामध्ये प्रवासी वाहन विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत 1.6 टक्क्यांनी वाढून 3,99,386 युनिट झाली आहे. एसयुव्ही वाहनांची मागणी जास्त असल्यामुळे जानेवारी महिन्यात प्रवासी वाहन विक्री विक्रमी पातळीवर जाण्यास मदत झाली आहे.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एकूण प्रवासी वाहन विक्री 3,93,074 युनिट झाली झाली होती. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार एसयूव्ही वाहनांची विक्री जानेवारी महिन्यात सहा टक्क्यांनी वाढून 2,12,995 युनिट झाली. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये ही विक्री 2,00,917 युनिट झाली होती.
सर्वसाधारण कारची विक्री जानेवारी महिन्यामध्ये 1,27,065 या आकड्यावर जवळपास स्थिर राहिली असे या संघटनेचे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले.
स्कूटरच्या विक्रीत जास्त वाढ
जानेवारी महिन्यामध्ये एकूण दुचाकी विक्री 2.1 टक्क्यांनी वाढवून 15,26,218 युनिट झाली आहे. जी की गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये 14,95,183 युनिट होती. स्कूटरची विक्री 12.4 टक्क्यांनी वाढून 5,48,201 युनिट झाली आहे. मोटरसायकलची विक्री मात्र 3.1 टक्क्यांनी कमी होऊन 9,36,145 युनिट झाली. मोपेडची विक्री कमी होऊन 41,872 युनिट झाली. तीन चाकी वाहनांची विक्री 7.7% वाढून 58,167 युनिट झाली आहे. जी की गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये 53,991 युनिट होती.
आगामी काळ आशादायक
जानेवारी महिन्यात व्याजदर जास्त पातळीवर होते. तरीही एकूण वाहन विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. आता अर्थसंकल्पामध्ये प्राप्ती कर उत्पन्न मर्यादा 12 लाख रुपयापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर रिझर्व बँकेने पाव टक्के व्याजदरात कपात केली आहे. आणखी एक व्याजदर कपात लवकरच होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विविध वाहनांची विक्री आगामी काळात वाढण्यासाठी पूरक वातावरण निर्माण झाले असल्याचे वितरकांनी सांगितले.