मसूर – यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यास पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने २०२१- २२ चा उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा दक्षिण विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
तसेच २०२१-२२ चा उच्चत साखर निर्यातीसाठी देशपातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार नॅशनल फेडरेशन ऑफ को- ऑप शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली यांच्या वतीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधीपक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीपराव वळसे-पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील व मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
कारखान्याचे चेअरमन, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सर्व संचालक व अधिकारी यांनी कारखान्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी राज्यातील सर्व साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक, कार्यकारी संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जनरल मॅनेजर व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अधिकारी आदि उपस्थित होते.