* मायमराठीच्या झेडपी शाळांमध्ये प्रवेश
* पालकांचाही ओढा जिल्हा परिषद शाळांकडे
राहुल शिंदे
नीरा – पुणे जिल्ह्यातील अनेक इंग्रजी माध्यमातील शाळांतील विद्यार्थ्यांनी आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांना निरोप देत मराठी शाळेतून शिक्षण घेणे पसंत केले आहे. यावर्षी 1952 विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेला अखेरचा निरोप देऊन जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.
मागील दहा वर्षांच्या काळात ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले होते. गावोगावी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या होत्या. अनेक पालकांनी खोट्या प्रतिष्ठेपायी मुलांना इंग्रजी शाळेत पाठवले होते. याला जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी अनास्था देखील करणीभूत होती. त्यामुळे पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे वाढला होता.
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होत्या, तर माध्यमिक शाळांनाही याचा चांगला फटका बसला होता; मात्र यानंतर नोकरी जाण्याची किंवा इतर विभागात वर्ग होण्याची टांगती तलवार शिक्षकांवर आली आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व शिक्षक खडबडून जागे झाले. यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांनी आपल्यामध्ये अनेक बदल घडवून आणले.
सेमी इंग्रजीतून शिक्षण सुरू केले, पालकांशी संवाद वाढवला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले. यामुळे आता पालकांचाही ओढा जिल्हा परिषदेकडे वाढला आहे. त्यातच जिल्हा परिषदेच्या शाळेत गणवेश व पुस्तके मोफत मिळत आहेत. चांगले आणि मोफत शिक्षण मिळत असल्याने आता पालकांचा जिल्हा परिषद शाळांकडे कल वाढला आहे.
तालुका निहाय विद्यार्थ्यांचे प्रवेश
खेड (386), शिरूर (366), हवेली (264), मुळशी (159), मावळ (137), इंदापूर (135), बारामती (123), पुरंदर (115), दौंड (108), भोर (47), आंबेगाव (44), जुन्नर (32), वेल्हे (6).
गाड्या आपली…
करोनाकाळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पालकांना शुल्कसाठी धारेवर धरले. शुल्कामध्ये कोणतीही सवलत दिली नाही. करोना काळात अनेकांच्या उत्पन्नात घट झाली होती. त्यामुळे पालक मेटाकुटीला आला होता. त्यातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शुल्कसाठी तगादा लावल्याने “गड्या आपली जिल्हा परिषदेची शाळाच बरी’ असे म्हणत पालकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पाठ फिरवली आहे.
जिल्हा परिषदेच्या 1 ली ते 8 दरम्यानच्या वर्गात यावर्षी 28 हजार विद्यार्थी नव्याने दाखल झाले आहेत. 2022-23 या वर्षात 2 लाख 29 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
– संध्या ढमाळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे