पुणे- हडपसरमधील एका 19 वर्षीय टोळीप्रमुखाच्या टोळीवर “मोक्का’ लावण्यात आला आहे. संबंधित टोळीने 16 वर्षीय मुलाच्या गाल व डोक्यात चाकूने वार करून जीवे मारण्याच्या प्रयत्न करत दहशत पसरवली होती.
पीडित 16 वर्षीय मुलगा 1 ऑगस्ट रोजी त्याच्या मित्रास भेटण्यासाठी मांजरी येथील त्यांच्या गॅरेजवर गेला होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या भैय्या पानसरे व त्याचे इतर दोन अनोळखी मित्रांनी गाडी पुसायला कापड मागितले. ते न दिल्यावरून चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पीडित मुलाच्या मित्राचे वडील हे भांडणे सोडवत असताना त्यांच्यावरही चाकूने वार केले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी टोळीप्रमुख आकाश भापकर (19, रा. कवडीपाट, लोणी काळभोर), योगीराज ऊर्फ भैय्या पानसरे (21, काळुबाई वसाहत, माळवाडी), अभिजीत सावंत (23, फुरसुंगी) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
संबंधित टोळीवर यापूर्वी खंडणीची मागणी, हत्यारासह गंभीर दुखापत करणे असे पाच गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत मोक्काचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांचे कार्यालयाकडे पाठवला होता. त्यांनी प्रस्ताव मान्य करून तपास सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्याकडे सोपवला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे मार्गदर्शनाखाली मोक्काअंतर्गत आतापर्यंत 53 कारवाया करण्यात आलेल्या आहेत.