आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पाणीप्रश्न सुटणार
तळेघर – आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील तब्बल 19 गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे, तसेच शेतीसाठीही मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील 19 गावांना कमळजाई उपसासिंचन योजनांद्वारे डिंभे धरणातून शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील व कामगार उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत या योजनेच्या सर्वेक्षणासाठी तब्बल 35 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत सर्वेक्षणाचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. मुंबई येथे रविवार (दि. 9) झालेल्या बैठकीला आमदार रोहित पावर, जलसंपदा सचिव खलील अन्सारी, आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती संजय गवारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, माजी पंचायत समिती उपसभापाती सलीम तांबोळी, पुणे जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे, कमळजाई उपसासिंचनाचे अध्यक्ष काळूराम लोहकरे, उपाध्यक्ष मारुती केंगले, शांताराम लोहकरे, अशोक शेंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेवाडी, पोखरी, चिखली, जांभोरी, मेघोली, तळेघर, फलोदे, राजपूर, म्हातारबाची वाडी, नांदूरकिची वाडी, तेरुंगण, निगडाळे, गोहेखुर्द, कोंढवळ, कोलतावडे, कळंबई, गोहे बुद्रुक, बोरघर फुलवडे कामांना गती येईल.
संजय गवारी,
सभापती, आंबेगाव तालुका पंचायत समिती.
कुकडी प्रकल्पांतर्गत आदिवासी भागात डिंभे धरणात 13.50 टीएमसी पाणीसाठा आहे.या पाण्यापैकि आदिवासी धरण ग्रस्त शेतकऱ्यांसाठी सहा टक्के पाणीसाठा आरक्षित आहे. यात कमळजाई उपसासिंचन योजनेसाठी व बोरघर, फुलवडे, गोहे बुद्रुक, या शेती पाणी उपसा योजनेसाठी 0.60 टीएमसी पाणी आवश्यक आहे.यामुळे सुमारे पाच हजार पाचशे एकर क्षेत्र ओलिताखालील येणार आहे तर एक हजार सहाशे एकर क्षेत्र ठीबक सिंचना खाली येणार आहे.
सुभाष मोरमारे, माजी समाज कल्याण सभापती.
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पाणी प्रश्न या योजनेमुळे सुटणार आहे. आदिवासी भागातील महिलांना उन्हाळ्यात पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, या योजनेमुळे आदिवासी भागातील महिलांची पाण्यासाठी होणारी हेळसांड थांबणार आहे. योजनेमुळे आदिवासी भागातील आर्थिक सुबत्ता वाढेल व शेतकरी हा आर्थिक स्वावलंबी जीवन जगेल.
सलीम तांबोळी, माजी उपसभापती पंचायत समिती आंबेगाव.