सुमारे 81 टक्के व्यक्तींना होते अन्य आजार
पुणे – करोनामुळे शहरामध्ये शुक्रवारपर्यंत 1 हजार 133 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महापालिका प्रशासनाने मृतांच्या नोंदी करताना रुग्णांना असलेल्या इतर आजारांचीही माहिती घेतली आहे. यापैकी पहिल्या 765 रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करण्यात आले असून, फक्त करोनामुळे 144 रुग्णांचा अर्थात सुमारे 19 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 621 मृत अन्य गंभीर आजारांनी त्रस्त होते. टक्क्यांमध्ये ही आकडेवारी 81 टक्के आहे.
करोनाला बळी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे एकाहून अधिक आजार असलेल्यांचे आहे. इतर आजारांमुळे प्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांना लागण लवकर होते. यावर अद्याप औषध मिळाले नसले, तरी वेळेत आणि योग्य औषधोपचार तसेच घाबरून अवसान न गाळता प्रबळ इच्छाशक्ती बाळगणे हाच यावर पूरक उपाय असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, पुण्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना करोनाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या 19 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. यापैकी बहुतांश रुग्णांना इतर कोणतेही आजार नव्हते. परंतू पॉझिटिव्ह निघाल्यानंतर उपचारांची नियमितता न पाळणे, वैद्यकीय सल्ला न ऐकणे आणि केवळ भीतीमुळे कमी झालेला आत्मविश्वास याला अनेकजण बळी पडत आहेत. शहरात एकूण करोना रुग्णांच्या तुलनेत मृतांची संख्या अडीच टक्के आहे. तर उर्वरित रुग्णांपैकी सुमारे 95 टक्के रुग्णांना हलकी लक्षणे आणि काहींना काहीच लक्षणे नाहीत. याच कारणास्तव करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण 63 टक्के आहे.
समुपदेशन कक्षही सुरू
मृत्यूदर घटवण्यासाठी रक्तदाब, मधुमेह, ह्दयविकार तसेच एकांहून अधिक व्याधी असलेल्या रुग्णांची अधिकाअधिक काळजी घेणे, तसेच लागण झाल्यानंतर सर्वच रुग्णांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसेच मनोर्धैर्य उंचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या रोग्यांच्या समुपदेशनासाठी ससून रुग्णालयात महापालिकेच्यावतीने समुपदेशन कक्षही सुरू करण्यात आला आहे.