मंचर – पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी केंद्रीय वित्त आयोगाने मान्यता देत या रेल्वेमार्गासाठी केंद्राच्या 20 टक्के निधीपैकी 19.5 टक्के निधीलाही मंजुरी दिली असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. आढळराव पाटील म्हणाले, केंद्रीय वित्त आयोगाने दिलेल्या मान्यतेमुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या मंजुरीचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. आता लवकरच निती आयोग आणि मंत्रिमंडळाच्या अंतिम मान्यतेनंतर प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु होणार आहे.
पुणे जिल्ह्यातून मी तर नाशिक जिल्ह्यातून शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी या रेल्वेमार्गासाठी लोकसभेत पाठपुरावा केला आहे. रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे. यासाठी मी खासदार नसलो तरीदेखील नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्याशी अनेकदा चर्चा मसलत करुन रेल्वे बोर्डाकडे याविषयीचा पाठपुरावा करीत आहे. बहुप्रतिक्षित रेल्वेमार्गासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने राज्य शासनाचा 20 टक्के हिस्सा म्हणजे 3 हजार 200 कोटीच्या रकमेस काही महिन्यांपूर्वी मान्यता दिली आहे.
मी खासदार म्हणून 16व्या लोकसभेत कार्यरत असताना तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे याविषयीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन कामातील आवश्यक बाबी पूर्ण करुन घेतल्या होत्या. त्यामुळे सन 2016च्या रेल्वे अर्थसंकल्पात सुरेश प्रभू यांनी या रेल्वेमार्गाची घोषणा करुन पुणे-नाशिक रेल्वेचा समावेश केला होता. परिणामी महारेलची स्थापना होऊन प्राथमिक कामांसाठी 100 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आपल्याला यश आले होते. महारेलच्या माध्यमातून या लोहमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येऊन आवश्यक जमीन अधिग्रहणाची प्रक्रियादेखील सुरु आहे.
पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यांना जोडल्या जाणाऱ्या या रेल्वे प्रकल्पामुळे या भागातील शेती, औद्योगिक, व्यापार, उद्योग तसेच पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.त्याकरिता लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे माझा पाठपुरावा असाच सुरु राहणार आहे.
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार शिवसेना