दोन दिवसांत पिंपरीत 189 बाधितांचा मृत्यू

  •  4970 जण नव्याने बाधित

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून, रोजच धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 48 तासांत (दोन दिवसांत) पुन्हा तब्बल 4970 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 2 लाख 15 हजार 393 इतका झाला आहे. तर गेल्या 48 तासांत तब्बल 189 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

शनिवार आणि रविवारी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार शनिवारी (दि. 1) शहरातील 2037 जणांना करोनाची लागण झाली तर रविवारी (दि. 12) 2933 जणांचा अहवाल सकारात्मक आल्याने दोन दिवसांत नव्याने 4970 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही प्रमाणात बाधितांचा आकडा कमी होत असला तरी मृत्यूचे प्रमाण मात्र वाढतच चालले आहे. शनिवारी तब्बल 97 रुग्णांचा तर रविवारी 92 रुग्णांचा मृत्यू झाल्याने दोन दिवसांतील मृतांचा आकडा 189 वर पोहोचला आहे. दोन दिवसांत मृतांमधील 81 जण शहराबाहेरील रहिवासी होते. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 3033 वर पोहोचला असून, शहराबाहेरील 1521 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 4554 ची संख्या आज गाठली.

आतापर्यंत शहरातील 1 लाख 90 हजार 421 जण करोनामुक्त झाले असून, शहराबाहेरील 12682 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. दोन दिवसांत करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 4853 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 1492 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेल्या 10 हजार 749 जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयात 30 बाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात रविवारी (दि. 2) नव्याने 30 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. वाल्हेकरवाडी, लिंबगाव म्हाळुंगे, नांदेड सिटी, राजगुरूनगर, दिघी, पुणे, हिंजवडी, पिंपळे निलख, औंध रस्ता, रहाटणी, सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, विश्रांतवाडी, लोणंद, शिवाजीनगर येथील रुग्ण हे करोनाबाधित आढळले आहेत. जुनी सांगवी, जांबे, लिंबगाव म्हाळुंगे येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये 2 पुरुष आणि एका महिला रुग्णाचा समावेश आहे. रुग्णालयातून बरे झालेल्या 4 महिला आणि 3 पुरुष रुग्णांना घरी सोडण्यात आले. रुग्णालयामध्ये सध्या 72 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 51 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 3 हजार 767 करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 1 हजार 197 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर, 1 हजार 874 रुग्ण सध्या गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.