टाकळी हाजी -पुणे जिल्ह्यातील 186 शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली असून निकाल शिक्षकांच्या बाजूने लागला आहे.
याबाबत माहिती अशी की, सेवेतील कामाबद्दल शासकीय कर्मचाऱ्यांचे दरवर्षी गोपनीय अभिलेखे वरिष्ठांकडून भरले जातात. शासन निर्णय 11 फेब्रुवारी 1974 आणि 20 जून 1989 अन्वये सलग तीन अत्युत्कृष्ट गोपनीय अभिलेख असतील तर एक आणि सलग पाच असतील तर दोन आगाऊ वेतनवाढी देण्यात येत होत्या.
पुणे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना जिल्हा परिषदेने अशा वेतनवाढी जाहीर केल्या. दरम्यान सहावा वेतन आयोग लागू केल्यानंतर ऑक्टोबर 2006 ते जुलै 2009 मधील वेतनवाढी प्रलंबित ठेवल्या आणि 24 ऑगस्ट 2017 च्या आदेशान्वये आगाऊ वेतनवाढी देणे रद्द केले.
या अन्यायाविरुद्ध पुणे जिल्ह्यातील शिक्षकांना एकत्र करून मुंबई उच्च न्यायालयात 18 जुलै 2019 रोजी याचिका दाखल करण्यात आली. अनिल पलांडे आणि इतर 185 विरुद्ध महाराष्ट्र शासन, रीट पिटीशन क्र. 9420/2019 याचिकेवर करोना कालावधीत 27 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबई उच्चन्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंतिम सुनावणी झाली.
यात न्यायमूर्ती एन. आर. बोरकर आणि के. के. तातेढ यांच्या घटनापिठाने वेतनवाढी बहाल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. संदिप सोनटक्के यांनी काम पाहिले, अशी माहिती संयोजक तथा पदवीधर संघटनेचे राज्यसरचिटणीस अनिल पलांडे यांनी दिली.
यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच ज्यांची वसुली केली आहे त्यांना फरकासह रक्कम परत करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.
पाचव्या वेतन आयोगाच्या निर्देशानुसार आगाऊ वेतनवाढ देण्याचे नियोजन केले गेले; परंतु सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ देण्याचे स्पष्ट संकेत नसल्यामुळे शिक्षकांना वेतनवाढ मिळाली नाही. अतिउत्कृष्ट काम करून देखील शिक्षकांना वेतनवाढ मिळत नसल्याने यांच्यावर अन्याय होत होता. या निर्णयामुळे शिक्षकांना वेतनवाढ मिळणार असल्याने काम करण्यास अधिक प्रेरणा मिळेल.
-अनिल पलांडे,
राज्य सरचिटणीस पदवीधर संघटना.
चांगले काम करणाऱ्या शिक्षकाला आगाऊ वेतनवाढ मिळाली पाहिजे. सध्याच्या आयोगात आदर्श शिक्षक पुरस्कार वेतनवाढ देण्यात येत नाही. आदर्श शिक्षकांना देखील वेतनवाढ मिळाली तर अधिक चांगले काम करण्यची प्रेरणा मिळेल.
– संतोष थोपटे,
शिरूर तालुका अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ
सलग तीन, पाच वर्षे आदर्श काम केल्याचे समाधान या निर्णयामुळे शिक्षकांना मिळाले आहे. यापुढील काळात देखील अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा शिक्षकांना मिळणार आहे.
-बापुसाहेब लांडगे,
माजी तालुकाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ.
सलग तीन अथवा पाच वर्षे अतिउत्कृष्ट काम करून या आयोगात आगाऊ वेतनवाढ मिळत नव्हती. न्यायालयाच्या आदेशानुसार वेतनवाढ मिळणार असल्याने चांगले काम केल्याचे समाधान मिळणार आहे. आणि अधिक काम करण्यास प्रेरणा मिळेल.
– सुभाष कोरडे, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते
वेतनवाढ तरतूद झाल्यास चांगले काम केल्याचे समाधान आहेच परंतु ह्या वेतनवाढीचा फायदा निवृत्त व पेंशन धारकांना निशित्त मिळणार असून या निर्णयामुळे पेंशन धारक म्हणून मी समाधानी आहे.
-रामचंद्र दौंडकर,
निवृत्त शिक्षक व राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक.