फ्लॅटमध्ये राहणे महागणार, आता मेंटनन्सवर द्यावा लागणार तब्बल ‘इतका’ जीएसटी

नवी दिल्ली – फ्लॅट खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते. चांगल्या आलिशान फ्लॅटमध्ये राहण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. मात्र, आता मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीयांचे फ्लॅटमध्ये राहणे महागणार आहे. आता हाउसिंग सोसायटींच्या मेंटनन्सवर केंद्र सरकार 18 टक्के जीएसटी लावणार आहे. केंद्र सरकारने गृहनिर्माण नियमांमध्ये बदल केले आहेत. जर तुम्ही गृहनिर्माण संस्थेच्या देखभालीसाठी दरमहा 7500 रुपयांपेक्षा जास्त पैसे देत असाल तर जीएसीटी द्यावा लागणार आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने गृहनिर्माण संस्थांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. याअंतर्गत, जर अपार्टमेंटचा देखभाल खर्च दरमहा 7500 रुपयांपेक्षा जास्त आणि वर्षाला 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. मात्र, हा जीएसटी सरसकट लावला जाणार नाही. त्यासाठी मेंटनन्स मर्यादा लावली जाणार आहे.
तथापि, जर एखाद्या व्यक्तीकडे गृहनिर्माण सोसायटीमध्ये दोन किंवा अधिक फ्लॅट असतील आणि तो दरमहा प्रत्येकी 7500 रुपये देखभालीचा खर्च भरतो, एकूण 15,000 रुपयांपर्यंत मेंटनन्स भरत असाल तर त्याला प्रत्येक फ्लॅटसाठी कोणताही जीएसटी भरावा लागणार नाही. त्यांना संपूर्ण रकमेवर जीएसटी भरावा लागेल.
जीएसटी कौन्सिलने जानेवारी 2018 मध्ये झालेल्या त्यांच्या 25 व्या बैठकीत आरडब्ल्यूए आणि गृहनिर्माण संस्थांना फायदा व्हावा यासाठी सूट मर्यादा 5000 रुपयांनी वाढवून 7500 रुपये प्रति महिना केली. दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. अशा परिस्थितीत देखभाल खर्चावर जीएसटी लागू केल्याने सर्वसामान्यांना आठवड्याच्या आत दुसरा झटका बसला आहे.
जीएसटी देण्याचा नियम काय?
समजा, तुम्हाला दरमहा मेंटनन्सवर 9000 रुपये खर्च करावे लागत आहेत आणि संपूर्ण सोसायटीची वार्षिक उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. तर आता तुम्हाला जीएसटी स्वरूपात 1620 रुपये अतिरिक्त आकारले जातील. ज्यामुळे तुम्हाला 9000 रुपयांऐवजी 10,620 रुपये दरमहा द्यावे लागतील. तथापि, 18 टक्के जीएसटीचा हा नियम सर्व फ्लॅटवर लागू होणार नाही. अशा परिस्थितीत, तुमच्या अपार्टमेंटला किती जीएसटी द्यावा लागेल हे पाहण्यासाठी स्थानिक कमर्शियल टॅक्स ऑफिसमध्ये 500 रुपयांचे शुल्क भरून माहिती घेता येईल.





