एमआयडीसीतून 18 लाखांचे टायर लंपास

अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नवनागापूर येथे गोदामाची भिंत फोडून केली चोरी

नगर(प्रतिनिधी) – नवनागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीच्या एमआरएफ कंपनीचे गोदाम फोडून चोरट्याने 17 लाख 98 हजार 286 रूपये किंमतीचे 206 टायर लंपास केले आहे. याप्रकरणी गोदामाचे मालक शिवचरण दास दिनाबंधू दास (वय- 41 रा. नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, नवनागापूर येथे शिवचरण दास दिनाबंधू दास यांचे एमआरएफ कंपनीच्या टायरचे गोदाम आहे. शुक्रवार (दि.6) सायंकाळी साडेसहा ते शनिवार (दि.7) सकाळी सातच्या दरम्यान गोदामाच्या मागील बाजूची भिंत चोरट्यांनी फोडून 120 ट्रकचे व 86 दुचाकीचे असे 17 लाख 98 हजार 286 रूपयांचे 206 टायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांनी गोदाम फोडून रात्रभर लाखो रुपायाचे टायरांची वाहतूक करून बाजूला काटवनात आणून टाकले. या काटवनातूनच त्यांनी वाहनाने टायर लंपास केले असल्याचा संशय आहे. काही टायर त्याठिकाणी मिळून आले.

गोदाम फोडून चोरट्यांनी रात्रभर टायरांची वाहतूक केली. 206 टायरांची वाहतूक करून ते एका वाहनात भरून घेऊन गेले असावेत. सकाळ झल्याने स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने बाकी टायर तेथेच सोडून चोरटे फरार झाले. यामुळे बाकी टायर वाचले. तरी चोरटे सुमारे 18 लाखांचे टायर चोरण्यात यशस्वी झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.